नाशिक – नाशिकच्या महापौर व उपमहापौरपदाच्या नाव निश्चितीत भाजपने घराणेशाहीचा वारसा पुढे नेला आहे. घराणेशाहीचे आरोप टाळण्यासाठी महापालिका निवडणुकी्च्या तोंडावर आमदार, खासदारांच्या मुलांना तिकीटे न देण्याचे फर्मान निघाले होते. या नियमाची सोईने अमलबजावणी झाली. आता कौटुंबिक राजकीय वारसा लाभलेल्या व्यक्तींना महापौर, उपमहापौरपदासाठी पसंती देण्यात आली आहे.

नाशिकच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. कुंभमेळ्यामुळे या पदांसाठी पक्षात मोठी स्पर्धा होती. पालिकेतील कामाच्या अनुभवाच्या आधारे पक्षाने महापौर पदासाठी माजी स्थायी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांचे तर, उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित केले. विरोधकांची घराणेशाही हा भाजपच्या प्रचारात नेहमीच मुद्दा असतो. परंतु, नाशिकच्या महापौर, उपमहापौरपदासाठी योग्य व्यक्ती निवडताना भाजप स्वत: देखील त्यापासून अलिप्त राहू शकला नसल्याचे अधोरेखीत झाले.

महापौर पदासाठी नाव निश्चित झालेल्या हिमगौरी आहेर-आडके यांना मोठा कौटुंबिक राजकीय वारसा आहे. त्यांचे चूलत बंधू डॉ. राहुल आहेर हे चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार आहेत. डॉ. राहुल यांचे वडील डॉ. डी. एस. आहेर हे भाजपमधील बडे प्रस्थ मानले जात. त्यांनी राज्यातील पहिल्या युती सरकारमध्ये आरोग्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली होती. खुद्द हिमगौरी आहेर यांच्या मातोश्री शोभा आहेर या नाशिकच्या उपमहापौर तर, वडील बाळासाहेब आहेर हे मनपाच्या स्थायी समितीचे सभापती राहिले. अशा प्रबळ कुटुंबाकडे आता महापौरपद आले आहे.

उपमहापौरपदासाठी नाव निश्चित करताना वेगळे काही घडले नाही. या पदासाठी मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली. ते नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र आहेत. बाळासाहेब सानप हे नाशिकचे महापौरही राहिले आहेत. २०१९ मध्ये भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने ते एकसंघ राष्ट्रवादीतून मैदानात उतरले होते. पराभूत झाल्यानंतर पुन्हा स्वगृही परतले. त्यांच्या मुलास उपमहापौरपद देऊन पक्षाने एकप्रकारे त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जाते. हे निर्णय घराणेशाहीला साजेसे असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात होत आहे. मनपा निवडणुकीत भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य आणि आमदार सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे-बेंडाळे यांना घराणेशाहीचे आरोप होऊ नये म्हणून उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले होते. त्याचवेळी जळगावमधील आमदार राजू भोळे यांचा मुलगा विशाल भोळे हे मात्र तेथील महापालिकेत बिनविरोध निवडून आले होते.

भाजपमध्ये घराणेशाहीचा निकष सोयीसोयीने लावला जातो, याकडे पक्षाची मंडळी लक्ष वेधत आहेत. भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचा संबंध महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीशी जोडला जात आहे. भाजप प्रदेशकडून आलेली नावे मंत्री गिरीश महाजन यांनी बदलल्याने केदार यांनी अस्वस्थेतून राजीनामा दिल्याचे काही पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.