नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आहेर-आडके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चिती करण्यात आले. या दोन्ही पदांसाठी भाजपमध्ये कमालीची चुरस होती. मात्र कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका कामकाजाचा अनुभव असणाऱ्या हिमगौरी आहेर-आडके यांना पक्षाने संधी दिली आहे.
मंगळवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांची बैठक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील एका तारांकित हॉटेलमध्ये पार पडली. मंत्री महाजन यांनी नगरसेवकांशी संवाद साधल्यानंतर महापौरपदासाठी हिमगौरी आहेर-आडके व उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावांची अधिकृत घोषणा केली. नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक सहा फेब्रुवारीला होणार आहे. सातव्या पंचवार्षिकमधील या टप्प्यावर महापौरपदाची मानकरी कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा अंतिम दिवस होता. नाव निश्चितीनंतर भाजप नगरसेवक उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी पालिकेकडे रवाना झाले. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने ही निवड केवळ औपचारिकता मानली जात आहे.
आगामी २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. हिंदू धर्मीयांच्या या सर्वात मोठ्या उत्सवात महापालिकेवर आपले वर्चस्व राखण्यासाठी भाजपने निवडणुकीत चोख नियोजन करून बहुमत मिळवले होते. कुंभमेळ्यामुळे महापौरपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पदासाठी हिमगौरी आडके, दीपाली गिते, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यांच्यात मोठी स्पर्धा होती, तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप आणि ॲड. अजिंक्य गिते इच्छुक होते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामकाजाची माहिती आणि अनुभव असणे आवश्यक होते. नवीन चेहरा दिल्यास अडचणी येऊ शकल्या असत्या, त्यामुळे पक्षाने सर्वसमावेशक विचार करून हा निर्णय घेतला आहे, असे कुंभमेळामंत्री महाजन यांनी सांगितले. हिमगौरी आहेर-आडके यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापती म्हणून काम केले असून सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या अनुभवाचा कुंभमेळ्यात शहराला मोठा फायदा होईल, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
कोण आहेत हिमगौरी आहेर-आडके?
माहिती तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या हिमगौरी आहेर-आडके या श्री सप्तश्रृंगी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा आहेत. या संस्थेची नाशिकमध्ये आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि शाळा-महाविद्यालये आहेत. त्यांनी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतही पुरस्कार मिळवला आहे. भाजप महिला मोर्चाचे शहराध्यक्षपद, प्रभाग सातच्या नगरसेविका आणि महापालिकेच्या स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. हाच प्रशासकीय अनुभव त्यांच्या निवडीत कळीचा ठरला.

