नाशिक महापालिका निवडणुकीतील उमेदवारीकरिता दोन लाख रुपये घेतानाच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओप्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांकडून पैसे घेतल्याची कबुली लेखी खुलाशातून दिली असून हा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. उमेदवारांच्या सार्वत्रिक प्रचारासाठी पक्षनिधी म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये पक्षाकडून घेण्यात आले आणि त्या उमेदवारांच्या निवडणूक खर्चात सदर रक्कम समाविष्ट केली जाणार आहे, असा कबुलीवजा खुलासा सानप यांनी आचारसंहिता कक्षाला पाठविला आहे.

VIDEO: भाजपचा ‘पारदर्शक कारभार’; २ लाख द्या, तिकीट घ्या

पक्षाच्यावतीने या निधीचा हिशोब आयोगाला सादर केला जाणार आहे. काहीजणांकडून रोकड स्वरूपात घेतलेल्या पैशांबाबत आयोगाकडून त्यांना पुन्हा विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. तिकीटवाटप करताना भाजप कार्यालयामध्ये दोन लाख रुपये प्रत्येक उमेदवाराकडून मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पक्षाच्या अब्रूचे राज्यभर धिंडवडे उडाले होते. या व्हिडिओमुळे भाजपची चांगलीच दाणादाण उडाली होती. त्यानंतर तिकिटासाठी पैसे घेतल्याचा आरोप पक्षातीलच काही नाराजांनी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी,  यांनंतर याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेली तक्रार हा घटनाक्रम एकामागोमाग एक असा सुरूच होता. शरद आहेर यांच्या तक्रारीची  दखल घेत आचारसंहिता विभागाने आमदार सानप यांना नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सानप यांनी आयोगाकडे खुलासा सादर केला. या खुलाशातून उमेदवारांकडून दोन- दोन लाख रुपये घेतल्याची कबुली देताना हा निधी पक्षाच्या प्रचारासाठी वापरणार असल्याचा दावा सानप यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाकडून सामूहिक खर्च केला जाणार असून याकरिता हा निधी खर्च केला जाणार असल्याचे सानप यांनी खुलाशात म्हटले आहे. हा खर्च मुदतीमध्ये आयोगाकडे सादर केला जाईल असेही स्पष्टीकरण त्यांनी आयोगाच्या सरिता नरके यांच्याकडे दिले आहे.