स्वतंत्र विदर्भ राज्य, महिलांना मंदिर प्रवेश तसेच ‘भारतमाता की जय’ या विषयांवर भाजपने शनिवारी ठाम भूमिका घेतली आहे. स्वतंत्र विदर्भास पाठिंबा जाहीर करतानाच स्वतंत्र मराठवाडय़ास मात्र विरोध असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही मंदिरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना प्रवेश दिला पाहिजे, या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्य शासन अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले. तसेच ज्यांना ‘भारत माता की जय’ म्हणायचे नाही, त्यांना या देशातच राहण्याचा अधिकार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.
महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विविध मुद्दय़ांवरून स्थानिक पातळीवर मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांकडून सातत्याने भाजपला लक्ष्य केले जात आहे. त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने दोन दिवसीय प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी येथे झाली. त्यासाठी भाजपचे डझनभर मंत्री उपस्थित होते. यावेळी दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. छोटे राज्य असावे ही भाजपची आधीपासून भूमिका आहे, असे त्यांनी नमूद केले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांची निर्मिती झाली. तेव्हा स्थानिक जनतेने आनंदोत्सव साजरा केला. मात्र काँग्रेसच्या काळात तेलंगणा राज्य निर्मिती करताना रक्तपात झाल्याचेही दानवे म्हणाले.
हिंदू धर्म महिला व पुरुषांमध्ये लिंगभेद करीत नाही. कोणत्याही मंदिरात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना प्रवेश दिला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्य शासन अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर झालेल्या सभेत स्पष्ट केले. या प्रक्रियेत कोणी प्रसिद्धीसाठी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशात कोणी देशविरोधी घोषणाबाजी करते तर कोणी ‘भारत माता की जय’ म्हणणार नाही, असे म्हणत आहे. मात्र ज्यांना ‘भारत माता की जय’ म्हणायचे नाही, त्यांना या देशातच राहण्याचा अधिकार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.
दरम्यान, रविवारी कार्य समितीची बैठक होणार असून विविध ठराव या वेळी मांडले जाणार आहेत. या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल.
युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार की नाही, या विषयी स्पष्ट बोलणे टाळत दानवे यांनी त्या बाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आल्याचे नमूद केले.




कुठे गेला साधेपणा?
दुष्काळाचे चटके संपूर्ण महाराष्ट्रात सहन करावे लागत असताना भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक मात्र त्यास अपवाद ठरली. दुष्काळामुळे ही बैठक साधेपणाने होणार असल्याचे आधी जाहीर केले होते. परंतु, रणरणत्या उन्हामुळे भाजपने वातानुकूलित आलिशान सभागृहाची निवड केली.
सभागृहाबाहेरची हिरवळ प्रत्येकास प्रफुल्लित करणारी ठरली. मंत्री, खासदार व आमदारांना उन्हाच्या झळा बसू नयेत यासाठी निवास व्यवस्थाही वातानुकूलित राहील, याची दक्षता घेतली गेली. बैठकीस दिमाखात सुरुवात झाल्यानंतर मंत्री व पदाधिकाऱ्यांचे स्वागत पुष्पगुच्छांनी करण्यात आले. बैठकस्थळी चर्चेशिवाय दुष्काळ कुठेही जाणवला नाही.
शिवसेनेला टोला : मराठवाडय़ाला पाणी देण्याच्या निर्णयाचे समर्थन करीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. नाशिकमध्ये पाणी सोडण्यास ते विरोध करतात आणि औरंगाबादमध्ये पाणी मिळवण्यासाठी आंदोलन करतात. दुष्काळात पाण्यासारख्या विषयावर तारतम्य बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला.