जळगाव : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. खडसेंच्या संभाव्य भाजप घरवापसीच्या शक्यतेबरोबरच भाजपमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सत्ता संतुलन बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, या घडामोडींचा संबंध थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्रभावाशी जोडला जात असून, त्यांचे पक्षातील वर्चस्व मर्यादित करण्यासाठीच खडसेंना पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये स्वतःचे प्रभावी नेतृत्व निर्माण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख असून, संघटनात्मर बांधणीसह निवडणूक व्यवस्थापन आणि रणनीतीमध्ये त्यांना पक्ष नेतृत्वाकडूनही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये महाजन यांचे वर्चस्व सातत्याने वाढत गेले आहे. याच पार्श्वभूमीवर एकेकाळी भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेते असलेले एकनाथ खडसे यांची पुन्हा पक्षात एंट्री झाल्यास पक्षातील सत्ता संतुलन बदलू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, उत्तर महाराष्ट्रात एका नेत्याकडील वाढते केंद्रीकरण टाळण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व पर्यायी प्रभावी नेतृत्व उभे करण्याचा विचार करत असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये खडसे हे सर्वात सक्षम पर्याय मानले जात असल्याचे बोलले जात आहे.

तावडे-खडसे भेटीनंतर तर्क-वितर्क

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित काही वादग्रस्त छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नावाची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर लगेचच विनोद तावडे यांच्या भेटीनंतर खडसेंच्या भाजप घरवापसीच्या हालचालींना वेग आल्याने या दोन घडामोडींचा संबंध जोडत विविध राजकीय तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा अधिकच रंगली आहे. मात्र, या चर्चांबाबत भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

शरद पवार गटाची सावध मोर्चेबांधणी

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटानेही परिस्थितीची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. खडसे यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्याबरोबरच त्यांच्या समर्थकांना संघटनेत महत्त्वाची पदे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी खडसे समर्थक अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी सध्या तरी भाजपमध्ये जाण्याची शक्यता फेटाळून लावली असली, तरी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी वाढलेला त्यांचा संपर्क आणि अलीकडील राजकीय घडामोडी पाहता आगामी काळात मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खडसे यांच्या पुनरागमनामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या नेतृत्वाचे समीकरण बदलणार का आणि गिरीश महाजन यांच्या प्रभावाला त्याचा फटका बसणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.