नाशिक – महायुती सरकार अस्थिर करून राज्यात अराजकता माजविण्यासाठी राष्ट्रपुरुषांना वेठीस धरण्यापर्यंत वैफल्यग्रस्तांची मजल गेली आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील घटनेचे राजकारण करून सामाजिक शांतता बिघडविणाऱ्या विरोधकांवर कारवाई करा, अशी मागणीही उपाध्ये यांनी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा >>> लाडकी बहीण योजनेसाठी काय काम केले? लोकप्रतिनिधींसह पदाधिकाऱ्यांची श्रीकांत शिंदेंकडून हजेरी
घाणेरडे राजकारण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी सुरु केले आहे. बदलापूरची घटना दुर्दैवीच होती. परंतु, त्याचे राजकारण झाले. ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात नवीन प्रकल्प आला नाही .अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली. पंतप्रधान मोदींना दौऱ्यात काळे झेंडे दाखविण्याचे काम काँग्रेस करत आहे. जी भाषा संजय राऊत, उद्धव ठाकरे वापरत आहेत, त्यातून त्यांचे नैराश्य दिसत आहे. शिवाजी महाराज पुतळा प्रकरण दुर्देवी आहे. राजकारण न करता राजकीय टीका करा, तो अधिकार आहे. परंतु, महाराजांच्या स्मारकाचा फोटो तुम्ही ट्विट करता, हे राजकारण नव्हे तर, विकृती असल्याची टीका उपाध्ये यांनी केली. महायुतीचे सरकार तीन वेगळ्या प्रकारचे पक्ष मिळून झाले आहे. एखाद्या नेत्याची भूमिका वेगळी असू शकते. भाजप मोठा पक्ष आहे. पुढील विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही भाजप मोठा घटक पक्ष असेल, असे त्यांनी सांगितले.