नाशिक – नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार सीमा हिरे यांना लक्ष्य करणारे आक्षेपार्ह संदेश समाज माध्यमात टाकून दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिवसेनेतून (उध्दव ठाकरे) हकालपट्टी केलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या तीन समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत भाजपचे पदाधिकारी राकेश ढोमसे यांनी तक्रार दिली. अंकुश शेवाळे, धिरज राजपूत आणि गणेश दराडे अशी संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ठाकरे गटातून हकालपट्टीनंतर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. बडगुजर यांच्यावर १७ गुन्हे दाखल असून कारवाई टाळण्यासाठी ते भाजपमध्ये येण्याची धडपड करीत असल्याचे पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपमधून विरोध होत आहे. अशी परिस्थिती असताना बडगुजर समर्थक अंकुश शेवाळेसह अन्य दोन साथीदारांनी समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश टाकले.
दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने हे संदेश टाकल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयितांवर कारवाईची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.