नाशिक : सिडको परिसरात हाणामारी, दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या या गंभीर प्रश्नावर भाजपच्या आमदार सीमा हिरे व शहराध्यक्ष सुनील केदार यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात अंबडचे पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत हे अपयशी ठरत असून त्यांची तातडीने बदली करावी आणि वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे, अशी आग्रही मागणी आमदार सीमा हिरे यांनी केली आहे.
’कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेची तीव्रता कमी झाल्याने सिडकोत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारांकडून गंभीर गुन्हे केले जात आहेत. नाशिक पोलीस ‘कायद्याचा बालेकिल्ला’ असा डंका पिटत असले तरी सिडकोत मात्र याला छेद देणारे प्रकार घडत आहेत. मागील आठवड्यात त्रिमूर्ती चौक भागात १५ ते २० जणांच्या टोळक्याने हातात तलवार व कोयते घेऊन धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली होती. यावेळी नागरिक घाबरून सैरावैरा पळू लागले.
एका घरात नागरिकांचा धावपळ करताना भाजीच्या गरम पातेल्याला पाय लागल्याने ते दोन वर्षांच्या चिमुकलीच्या अंगावर सांडले आणि ती गंभीर भाजली गेली. ही घटना ताजी असतानाच, खुटवडनगर भागात शस्त्रधारी युवकांनी धुमाकूळ घालत एका तरुणावर वार केले. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असले तरी वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. काही दिवसांपूर्वी संतप्त नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. या पार्श्वभूमीवर आमदार सीमा हिरे आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली.
सिडकोतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात अपयश येत असतानाच, पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांची अरेरावी आणि उद्धटपणा यामुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी रोष निर्माण झाल्याचे आमदार हिरे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी राजपूत यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “मी स्वतः आठवड्यातून एक दिवस अंबड पोलीस ठाण्यात येऊन बसेन,” अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी रश्मी बेंडाळे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, छाया देवांग, शरद फडोळ, भूषण राणे, दिलीप देवांग, आबा पवार आदी उपस्थित होते.

