जळगाव : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. शपथविधीच्या निर्णयाची घाई झाली आहे. अजित पवार जाऊन चारच दिवस झाले आहेत. यावर मी काय बोलणार?, मात्र त्यांच्या या निर्णयामागे काही तांत्रिक अडचणी किंवा राजकीय रणनीती असू शकते, त्यामुळेच घाईत निर्णय घेण्यात आला असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या निर्णयाची घाई झाल्याचे मत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार जाऊन केवळ चार दिवस होत असताना, हा निर्णय घेण्यात आल्याने यावर अधिक भाष्य करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, “या निर्णयामागे काही तांत्रिक अडचणी किंवा राजकीय रणनीती असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच संबंधित निर्णय घेण्यात आला असावा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला आपण उपस्थित राहणार असल्याचेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात पुढील घडामोडींवर लक्ष केंद्रित झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तरी भाजपला त्याबद्दल काही वेगळे वाटण्याचे कारण नाही, अशी स्पष्ट भूमिका देखील मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली. “दोन्ही गट एकत्र झाले तर आम्हाला आनंदच आहे. नाही झाले तरी तो गट आमच्यासोबत आहे,” असे ते म्हणाले. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित निर्णय हा त्यांचाच विषय असून त्यांनीच तो ठरवावा. आम्हाला यामध्ये कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी नमूद केले. शपथविधीबाबत शरद पवारांना कोणतीही माहिती नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असताना, महाजन यांनी हा प्रश्न अजित पवार यांच्या गटाचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नेमके काय सुरू आहे, याची कल्पना कुणालाही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, जर दोन्ही गट एकत्र येण्यासारखे काही असते तर त्यांनी शरद पवारांना शपथविधीचे आमंत्रण दिले असते. मात्र, कार्यक्रम धावपळीमध्ये आणि छोटेखानी स्वरूपाचा असल्याने सर्वांनाच बोलावले गेले असेल, असे मला वाटत नाही, अशीही टिप्पणी मंत्री महाजन यांनी केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचाच असून काय करायचे आणि काय नाही, हे त्यांनीच ठरवावे, असे मतही गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.