bjp minister girish mahajan slams eknath khadse over dudh sangh election zws 70 | Loksatta

जळगाव : एकनाथ खडसेंनी दूध संघाच्या निवडणुकीत निवडून दाखवावे; गिरीश महाजन यांचे आव्हान

मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांचा विजय निश्‍चित आहे, असे भाष्य करीत त्यांनी खडसेंना डिवचले.

जळगाव : एकनाथ खडसेंनी दूध संघाच्या निवडणुकीत निवडून दाखवावे; गिरीश महाजन यांचे आव्हान

जिल्हा दूध दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी निवडून दाखवावे, असे खुले आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत आता चुरशीचा रंग भरत आहे. ग्रामविकासमंत्री महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल यांच्यात टोकाची चुरस निर्माण झाली आहे. मंत्री महाजन व मंत्री पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलचा सोमवारी मुक्ताईनगर येथील मलकापूर महामार्गावरील महेश इंगळे यांच्या पद्मश्री लॉनवर प्रचार मेळावा झाला. त्यात मंत्री महाजन यांच्यासह आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर जोरदार हल्लाबोल केला.

आमदार पाटील म्हणाले की, मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांश मतदारांना अपात्र करून बिनविरोध निवडून येण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. तालुक्यात २०१९पासूनची परिवर्तनाची लाट कायम आहे. यातच सत्तेचे विकेंद्रीकरण न झाल्याचा संताप मतदारांमध्ये आहे. यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांचा विजय निश्‍चित आहे, असे भाष्य करीत त्यांनी खडसेंना डिवचले.

हेही वाचा >>> जळगाव: राष्ट्रवादीच्या विनोद देशमुखांसह ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रचार मेळाव्यानंतर ग्रामविकासमंत्री महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सध्या मी काहीही म्हटले तरी खडसेंना ते आपल्यालाच बोलले असे लागते.

आपल्या मनासारखं झालं तर लोकशाही आणि विरुद्ध झालं तर टिंगलटवाळी. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपण ज्या पद्धतीने दबावतंत्र वापरलं आणि आपल्याच मुक्ताईनगर मतदारसंघात बिनविरोध येण्यासाठी कसे खोटे दाखले दिले, ते आता समोर येतेय. अर्थात कर्ज ज्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने घेतलेच नाही, त्याच्या नावाचा खोटा दाखला देऊन त्याची माघारी करून दाखविली, त्याला बाद करून दाखविले आणि स्वतः बिनविरोध झालो म्हणून ते शेकी मिरवत बसले. आता त्यांनी आत्मपरीक्षण करावं. मगच बोलावं, असा टोलाही मंत्री महाजन यांनी खडसेंना लगावला. खडसेंनी इतकी वर्षं काय केलं? ते पंधरा वर्षे मंत्री होते, पंधरा वर्षे विरोधी पक्षनेते होते, पंधरा वर्षे लाल दिव्याची गाडी होती.आपल्या कन्येला कोणत्या ठिकाणी अध्यक्ष केलं, मंदाताईंना दूध संघात अध्यक्ष केलं. मुंबई येथे महानंदाला काही संबंध नसताना तिथंही अध्यक्ष केलं. का आणि कशासाठी केलं? आपल्या घरात पद आलं तर चांगलं आणि आम्ही घेतलं तर वाईट! खडसे कशासाठी बँकेमध्ये होते? आपल्या मुलीला अध्यक्ष का केलं? असा प्रश्‍न मी विचारला तर… म्हणून मला असं वाटतं, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं , असे महाजन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 18:05 IST
Next Story
जळगाव: राष्ट्रवादीच्या विनोद देशमुखांसह ११ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल