भाजप, सेनेकडून मुलाखतींचा सोपस्कार

शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सोमवारपासून सुरुवात झाली.

नातेवाईकांना प्राधान्याची शक्यता; नवोदित इच्छुकांमध्ये चलबिचल

महापालिका निवडणुकीची धामधूम सध्या सुरू असली तरी भाजप आणि शिवसेनेकडे असलेली भाऊगर्दी पाहता आपली उमेदवारी निश्चित होईलच याची हमी कोणीही देऊ शकत नसल्याची स्थिती आहे. असे असले तरी विद्यमान आमदारांचे नातेवाईक, पदाधिकारी नेत्यांचे सगेसोयरे तसेच विद्यमान नगरसेवक यांना उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाणार असल्याच्या शक्यतेने नवोदित इच्छुक धास्तावले आहेत. ज्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, अशा प्रभागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे नाटक पक्षाकडून का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांकडे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीकरिता इच्छुकांची संख्या अधिक आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख विरोधी पक्षांचा दबदबा कमी झाल्याने प्रत्येक निवडणुकीत त्यांच्याकडे उमेदवारीसाठी दिसून येणारी गर्दी या वेळी आटली आहे. काही प्रभागांमध्ये त्यांच्यावर अक्षरश: उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. त्यामानाने निम्म्यापेक्षा अधिक विद्यमान नगरसेवकांनी फारकत घेऊनही मनसेकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या बऱ्यापैकी आहे. भाजप आणि शिवसेनेत निवडणुकीसाठी युती होण्याची शक्यता अंधूक झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळाच्या दिशेने तयारीला सुरुवात केली आहे. भाजपने सर्वप्रथम इच्छुकांच्या मुलाखतींचा सोपस्कार पूर्ण केला. भाजपचे तिघे आमदार विद्यमान नगरसेवकही आहेत. आमदारकी आणि नगरसेवकपद अशा दोन्ही ठिकाणी पाय रोवलेल्या या लोकप्रतिनिधींनी नगरसेवकपद पुढील निवडणुकीतही आपल्या परिवारातच राहावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे तिघा आमदारांशी संबंधित नातेवाईक त्यांच्या त्यांच्या प्रभागात उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांची उमेदवारी निश्चित होण्याची धास्ती प्रथमच उमेदवारीसाठी दावा करणाऱ्यांना आहे. पक्षाचे विद्यमान बहुतेक पदाधिकारीही  घरातच उमेदवारी राहण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यातच विद्यमान नगरसेवक उमेदवारीसाठी हक्क सांगत आहेत. त्यात इतर पक्षांमधून प्रवेश केलेल्यांचीही वेगळीच समस्या आहे.

शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सोमवारपासून सुरुवात झाली.  शिवसेनेतही काही पदाधिकारी, विद्यमान नगरसेवक व त्यांचे काही प्रभागांमधील नातेवाईक यांच्यासाठी उमेदवारी निश्चित मानली जात आहे.  शहरात विद्यमान आमदार नसले तरी नाशिकरोड परिसरात योगेश घोलप हे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित घरातील उमेदवार असणार हे निश्चितच. अशा प्रभागांचा मुलाखतींसाठी विचार करण्याऐवजी थेट उमेदवार जाहीर केल्यास मुलाखतींवर पक्षाचा खर्च होणारा वेळ वाचू शकेल, अशी खोचक प्रतिक्रिया त्या त्या प्रभागातील इच्छुक नवोदितांकडून होत आहे.

तर मुलाखतींची गरजच काय?

जर प्रत्येकाच्या प्रभागात संबंधितांची उमेदवारी निश्चित होणार असेल, तर अशा प्रभागांसाठी मुलाखती घेण्याची काय गरज, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. थेट त्या त्या प्रभागातील उमेदवारांची नावे आधीच जाहीर करावयास हवी, म्हणजे इतरांची निराशा तरी होणार नाही, असे मत मुलाखत दिलेल्या नवोदितांनी व्यक्त केले आहे. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्याऐवजी प्रभाग क्रमांक तीनमधून भाजपची उमेदवारी दुसऱ्या एखाद्या इच्छुकास कशी मिळू शकेल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर होण्याआधीच बडय़ा मंडळींशी संबंधित प्रभागांमधील नवोदित इच्छुकांच्या मनाची चलबिचल वाढली आहे. त्यासाठीच काही जणांनी ऐनवेळी दुसरा घरोबा करण्याचे ठरविले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp mla relatives get preference for municipal elections