बिघडत्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटणार
काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावरून रान उठविणाऱ्या भाजपला शहरात ती स्थिती आजही कायम असल्याची अखेरीस जाणीव झाली असून या प्रश्नावर तोडगा काढावा, यासाठी भाजपचे स्थानिक आमदार मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडणार आहेत. महापालिका निवडणूक जवळ आल्याने वातावरण बिघडवले जात असून या घटना रोखण्यासाठी पालकमंत्र्यांनीही पोलीस आयुक्तांना सूचित केल्याचे भाजप आमदारांनी म्हटले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खून, लुटमार, वाहनांची जाळपोळ, टोळीयुध्दातून प्राणघातक हल्ले, टवाळखोरांचा धुडगूस, महिलांचे दागिने खेचून नेणे असे अगणिक प्रकार घडत आहेत. विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर ज्या आक्रमतेने भाजपने आंदोलन केले होते, ती स्थिती सत्ताधारी झाल्यावर मात्र पूर्णपणे बदलल्याचे पहावयास मिळते. यावर काही अपवाद वगळता फारसे बोलणेही टाळले गेले. परंतु, आठवडाभरातील घटनांनी कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप आमदारांना त्याची दखल घेणे भाग पडल्याचे चित्र आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप आणि आ. सीमा हिरे यांच्याशी संपर्क साधला असता उभयतांनी वाढत्या गुन्हेगारी घटनांची गंभीर दखल घेतली असल्याचा दावा केला. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश महाजन यांना या घडामोडींची माहिती दिली गेली. त्यांनी पोलीस आयुक्तांना गुन्हेगारांवर तातडीने कारवाईचे निर्देश दिले असल्याचे सानप यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांकडे या स्थितीविषयी तक्रार करण्यात आली आहे. वरिष्ठ वगळता अन्य पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांमध्ये सत्ताबदल झाल्याची जाणीव नाही. ते काँग्रेस आघाडीच्या काळातील मानसिकतेत वावरत असल्याचे सानप यांनी सूचित केले. आ. हिरे यांनी कठोर कारवाई होत नसल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे स्पष्ट केले. वाहनांची जाळपोळ वा तत्सम घटनांमध्ये सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. पोलीस यंत्रणेकडे विचारणा केल्यास अपुरे मनुष्यबळ व तत्सम कारणे पुढे केली जातात. महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाशिकची कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहरातील सर्व आमदार लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे हिरे यांनी सांगितले. सद्यस्थितीत कोणत्याही गुन्ह्यात अटक झाली की जामीन घेऊन गुन्हेगार सुटतात. गुन्हेगारांना जरब बसेल अशी कारवाई होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mlas to meet the chief minister to discuss law and order issue in nashik
First published on: 17-05-2016 at 02:27 IST