नाशिक – भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या विषयावरील महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी नाशिक येथील स्वामी नारायण बँक्वेट हॉलमध्ये पार पडली. या बैठकीसाठी सभागृहाबाहेर उभारलेला भव्य फलक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरला. कारण, त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचे छायाचित्र कुठेही दिसत नव्हते. प्रमुख नेत्यांमध्ये माजी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा समावेश होता. राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे छायाचित्र नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहातील फलकावर मात्र वेगळे चित्र होते. तिथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना स्थान होते.
भाजपच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची एकत्रित संघटनात्मक बैठक प्रथमच नाशिकमध्ये झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. परंतु, दोन्ही विभागांतील प्रमुख नेते, मंत्री व लोकप्रतिनिधींनी बैठकीत पूर्णवेळ उपस्थिती लावली. यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डिकर आदींचा समावेश होता.
बैठकीसाठी आलेल्या प्रमुख नेत्यांच्या स्वागतासाठी सभागृहाबाहेर मोठा फलक लावण्यात आला होता. त्यातील त्रुटींवर काहींनी बोट ठेवले. या फलकावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय वाहतूकमंत्री यांच्यासह पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची छायाचित्रे होती. तसेच मुख्यमंत्री, नाशिकचे पालकमंत्री, नाशिकमधील तिन्ही आमदार, प्रमुख पदाधिकारी, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील मंत्री यांचीही छायाचित्रे फलकावर होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा मात्र विसर पडल्याकडे काहींनी लक्ष वेधले. जे. पी. नड्डा यांचे छायाचित्र असल्याने फलक तयार करताना बहुदा तेच अद्याप अध्यक्ष असल्याचे मानले गेल्याची शंका काहींनी व्यक्त केली.
या फलकावर मंत्री पंकजा मुंडे यांचे छायाचित्र नसल्याने मोठी चूक झाल्याचा सूर बीड जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी लावला. भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाच्या माजी राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा समावेश नाही. फलकात मराठवाड्यातील प्रमुख ओबीसी नेत्याला वगळल्याने त्या भागातील कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटला.
सभागृहातील फलक मात्र वेगळा
भाजपची बैठक ज्या सभागृहात झाली, तेथील फलक पूर्णतः वेगळा होता. तिथे निवडक सहा प्रमुख नेत्यांचीच छायाचित्रे होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारिणीतील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. सभागृहाबाहेरील फलकाप्रमाणे तिथे कुठलीही चूक झालेली नव्हती, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
