नाशिक – नाशिक महानगर पालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. महापालिका निवडणुकीच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांपैकी ७२ जागा स्वबळावर जिंकण्याची किमया करणाऱ्या भाजपने आता स्वबळावर सत्ता स्थापनेची तयारी केली आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे महापौरपद आपणास मिळावे, यासाठी स्पर्धेत असणाऱ्या प्रत्येक नगरसेविकेकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. अशाप्रसंगी भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी नगरसेवकांसाठी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महापालिकेवर वर्चस्वासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणुकीपासूनच व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली होती. ज्या प्रभागांमध्ये भाजपकडे सक्षम पर्याय नव्हते, अशा ठिकाणी ठाकरे गट, काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना पक्षात आणून सीमा हिरे, देवयानी फरांदे या आमदारांचा विरोध असतानाही त्यांना उमेदवारी दिली. विरोधकांना खिळखिळे करण्याची अशी खेळी खेळतानाच मित्रपक्ष शिंदे गट आणि अजित पवार गट यांना शेवटपर्यंत युती करण्याचे आश्वासन देत झुलवत ठेवले. आता महापौर आरक्षणात नाशिकचे महापौरपद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्याने महपौरपदासाठी सर्वसाधारण गटातील महिलांमध्ये चुरस आहे.
महापौरपद कोणाला मिळणार, याची चर्चा रंगली असताना भाजप शहराध्यक्ष सुनील केंदार यांनी एकंदरीतच सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे. नगरसेवकांना काही सल्लेही दिले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, मनसे, अपक्ष, काँग्रेस असे एकुण १२२ नगरसेवक निवडून आले असून ते पुढील पाच वर्ष या नाशिक शहरात आपापल्या प्रभागात प्राथमिक सुविधांसह इतर विकास कामे करण्यावर लक्ष देणार असल्याचे केदर यांनी म्हटले आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने भरघोस असा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून नाशिक जिल्ह्यास मिळणार आहे. हा निधी चांगल्या प्रकारे सत्कारणी लागावा आणि चांगल्या दर्जाची कामे व्हावीत, ही माफक अपेक्षा नाशिककर जनतेची आहे. तथापि, यापूर्वी काही नगरसेवकांनी नाशिकच्या नावाला व विकासाला गालबोट लागेल, असे कामकाज केल्याच्या तक्रारी आहेत. यापूर्वी नाशिक महानगरपालिका सुशिक्षित गुंडांचा अड्डा अशा स्वरूपाचे आरोप व प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिलेल्या आहेत. त्याला तशीच कारणेही होतीच, असे सुनील केदार यांनी नजरेस आणून दिले.
आपल्याला जर खरोखर सर्वसामान्य जनतेच्या प्रति बांधिलकी असेल आणि नाशिकचा चौफेर विकास करायचा असेल तर स्वार्थ बाजुला ठेवून काम करावे लागेल. मागील काळात नाशिकमध्ये भूमाफिया,गँगवार,टोळीयुद्ध, भुखंड घोटाळे,बदनाम झालेले सहकार क्षेत्र, लूट करून बंद पाडलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी साखर कारखाने अशा एक ना अनेक प्रकारे नाशिकचे नाव बदनाम झाले होते. आता त्यावर मात करून पुढील पाच वर्षे चांगले कामे करावे, जेणेकरून नाशिक प्रगतीच्या दिशेने जाईल, असे केदार यांनी नमूद केले आहे. नगरसेवकपद सेवेचे माध्यम असून ते सोन्याचे अंडे देणारी कोंबडी नाही, हे केदार यांनी ध्यानात आणून दिले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने लवकरच नवनिर्वाचित नगरसेवक यांचा प्रशिक्षण वर्ग उत्तन येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे घेण्यात येणार असून ज्यांच्या नावाने ही प्रशिक्षण संस्था स्थापन केली आहे त्या जननायक रामभाऊ म्हाळगी यांचे लोकप्रतिनिधी म्हणून काम देशात कसे आदर्शवत होते व त्यानुसार आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून कसे कामकाज करावे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे.
