नाशिक – स्थानिक पातळीवर जे कोणी पदाधिकारी, कार्यकर्ते येतील, त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्या…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत… बूथ (मतदान केंद्रस्तरीय) अध्यक्षांनी आपल्या परिसरात फिरावे… नव्या जिल्हाध्यक्षांनीही कार्यालयात बसू नये…नेत्यांच्या मागे फिरताना कोणी आढळल्यास त्याला उमेदवारी दिली जाणार नाही… अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना दिल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी येथे भाजपची उत्तर महाराष्ट्र विभागाची कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील आदींनी मार्गदर्शन केले. उत्तर महाराष्ट्रातील ६५० पदाधिकारी कार्यशाळेत सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.
निवडणुकीआधी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेण्यावर प्रदेशाध्यक्षांनी जोर दिला. जिल्हाध्यक्षापासून ते बूथ अध्यक्षापर्यंत सर्वांनी सक्रिय व्हावे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असून पक्ष तुमच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केल्याचे सांगितले जाते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या काळात सरकारने केलेले काम, मोदी सरकार येण्यापूर्वीची परिस्थिती, मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रात झालेले बदल, पायाभूत सुविधा, गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजना, फडणवीस सरकारचे १०० दिवसातील कार्य आणि पुढील दीडशे दिवसांचा संकल्प २५ जूनपर्यंत घरोघरी पोहोचविला जाणार असल्याचे सांगितले. विखे पाटील यांनी संघटनात्मक जबाबदारी आणि महाजन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रभावी योजनांची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपला अधिक जागा मिळाल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यापेक्षा कित्येक पट अधिक चांगली कामगिरी नोंदविण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.
राज्यात ८० संघटनात्मक नेमणूका झाल्या असून १२०० पेक्षा जास्त मंडल रचना पूर्ण झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही ही प्रकिया पूर्ण झाली असल्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. संकल्प से सिद्धीतक या उपक्रमांतर्गत राज्य शासनाने घेतलेले निर्णय, राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. कार्यशाळेत संघटनात्मक रचना आणि कार्यकारिणी निवड यावर काम करण्यात आले. मंडलनिहाय रचना कशी असेल, याविषयी माहिती देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.