जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीने डॅमेज कंट्रोल करण्यास वेग दिला असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील नाराजी दूर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, या महत्त्वाच्या शक्तिप्रदर्शनात पालकमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि त्यांचे समर्थक अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तरीदेखील गुलाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे सांगितले जात होते. विशेषतः त्यांच्या मुलासाठी ही जागा मिळावी, अशी त्यांची इच्छा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, अखेर ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली.
या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा केला. गुलाबराव पाटील हे मुंबईत महत्त्वाच्या कामानिमित्त गेले असल्याने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचा संबंध नाराजीशी जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कालपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र बसून निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करत होतो. तासाभरापूर्वीही गुलाबराव पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले असून, महायुतीमध्ये कोणतीही फूट नाही, असेही महाजन यांनी सांगितले.
महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत असल्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती अधिक मजबूत होईल, असा विश्वासही गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. विरोधकांकडून मुद्दाम अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीतील नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या उमेदवारासह नेत्यांनी पाळधी येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत विधान परिषद निवडणूक, महायुतीतील समन्वय आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
या वेळी भाजपचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेरचे उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, अमित देशमुख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर महायुतीतील नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. जिल्ह्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत समीकरणे, नाराजी आणि समन्वयाचे प्रयत्न यामुळे आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
