नाशिक – कंपनीच्या शेअर्समध्ये भागीदारी करून त्या बदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेपैकी सुमारे १० कोटी न देताच शेअर्स परस्पर नावे करून घेण्यात आल्याने सातपूर येथील उद्योजकाची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नातूसह आठ जणांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तथा उद्योजक कैलास अहिरे यांची एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. २०१८ मध्ये कंपनी मालक अहिरे यांची तत्कालीन मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मुंबई येथे भेट झाली. दानवे यांनी अहिरे यांच्याकडे कंपनीविषयी चौकशी केली. आपला नातू शिवम मुकेश पाटील आणि गिरीश पवार, सतीश अग्रवाल यांना कंपनीचे भागीदार करन घ्या, कंपनीची उलाढाल वाढवून देण्याची जबाबदारी आपली, असे सांगितले. कंपनीत सरकारी कामे देखील तुम्हाला मिळवून देतो, असा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार संबंधितांना १४ टक्के शेअर्स विकण्यात आले. यासाठी १२५ रुपये कोटी रक्कम ठरली. या व्यवहारात एक कोटी रुपये देतांना ५० लाखांचे दोन धनादेश देण्यात आले. उर्वरीत रक्कम न देतांच शेअर्स वर्ग करून घेतले.

दानवे यांच्या सांगण्यानुसार परस्पर संशयित गिरीश पवार आणि सतीश अग्रवाल यांच्या नावावर शेअर्स करण्यात आले. सुमारे २५ कोटी रुपये देण्याचे ठरले होते .यापैकी काही रक्कम जी दिली ती रक्कम गिरीश पवार आणि सतीश अग्रवाल यांच्या बँक खात्यातुन यायला पाहिजे होती. परंतु, सदरची रक्कम ही रावसाहेब दानवे यांचे भागीदार संजय कतीरा, सुभाश कतीरा यांची फ्रॉड कंपनी असलेल्या बँक खात्यातून देण्यात आली. संजय कतीरा आणि सुभाष कतीरा यांना तक्रारदार अहिरे हे ओळखतही नसून त्यांनी बनावट माणसे उभे करून त्यांच्या खात्यातून सुमारे ९ कोटी ७० लाख ८७ हजार इतकी रक्कम टाकली. परंतु, या दोघांनाही अहिरे ओळखत नसतानाही त्यांना पैसे देत असल्याचे भासवत दिशाभूल केली. त्यानंतर उर्वरित १० कोटी रुपयांची मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

याविषयी तक्रारदार अहिरे यांनी, उर्वरीत १० कोटी रुपयांसाठी सातत्याने पाठपुरावा करूनही पैसे देण्यात आले नाहीत, असे सांगितले.. एन. व्ही. ऑटो स्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत रावसाहेब दानवे यांच्या सांगण्यानुसारच गिरीश पवार आणि सतीश अग्रवाल यांच्या बरोबरच व्यवस्थापक म्हणून दानवे यांचा नातू शिवम पाटील याच्यासह संशयित कौस्तुभ लटके, सतीश अग्रवाल, धिरेंद्र प्रसाद संजय कतीरा, सुभाष कतीरा आणि मंदार टाकळकर यांची नावे टाकण्यात आली आहेत. या व्यवहारास संशयित जबाबदार असून पैसे न दिल्याविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशीराने गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली. माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून व्यवहार झाला. त्यांनी फसवणुक केलेली नाही. परंतु, त्यांचा नातु आणि अन्य त्यांच्या ओळखीतील लोक आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुूरू असल्याचे काळे यांनी सांगितले.