शहरात पाणीटंचाई उद्भवल्यास भाजप जबाबदार!

पाणी कपातीच्या दिरंगाईवरून पालकमंत्री छगन भुजबळ यांची टीका

(संग्रहित छायाचित्र)

पाणी कपातीच्या दिरंगाईवरून पालकमंत्री छगन भुजबळ यांची टीका

नाशिक : पावसाअभावी धरणांतील जलसाठा कमी होत असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजप कपातीचा निर्णय घेण्यास तयार नाही. नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापौरांनी कपातीची गरज नसल्याचे म्हटले होते. सध्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा आहे. पाऊस आणखी लांबल्यास लातूरसारखी भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्वत्र पाण्याचा काटेकोरपणे वापर होण्याची गरज असून टंचाईचे संकट उद्भवल्यास शेवटी जबाबदारी तुमची राहील, अशा शब्दात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला फटकारले.

शुक्रवारी करोनाच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पावसाअभावी उद्भवलेल्या स्थितीवर प्रश्न उपस्थित झाले. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या १९४३ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३५ टक्के जलसाठा आहे. याआधी पाटबंधारे विभागाने पाणी बचतीसाठी योग्य ती पावले उचलण्याचे महापालिकेला सूचित केले होते. परंतु, नगरसेवकांच्या दबावामुळे सत्ताधारी भाजपने कपात करणे टाळले. महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आपल्या कार्यकाळात पाणी कपात नको या भावनेतून कपातीच्या निर्णयास चालढकल केली जात असल्याचे सांगितले जाते. या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाल्यावर पालकमंत्र्यांनी महापालिकेपासून तालुकास्तरापर्यंत पाण्याचा सांभाळून वापर होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. पाऊस लांबल्याने जिल्ह्यात पेरण्यांही रखडल्या आहेत. अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उपलब्ध पाण्याची बचत न केल्यास धरणातील जलसाठे कमी होतील. पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ शकतात. यामुळे सर्वानी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे सांगितले.

नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही तर लातूरसारखी स्थिती निर्माण होऊ शकते. त्याची जबाबदारी कोण घेईल हे त्यांनी सांगावे. सद्यस्थितीत पाणी वाचविण्याची गरज आहे. पाणी कमी प्रमाणात असेल तर कपात टाळायचा प्रश्न येत नाही. भाजपच्या कार्यकाळात कपात नको तर यांच्या कार्यकाळात पाऊस का होत नाही, असा टोला भुजबळ यांनी लगावला.

स्थिती पाहून लवकरच निर्णय

शहराला १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा करता येईल इतके पाणी धरणात उपलब्ध आहे. या आठवडय़ात पाऊस न झाल्यास पुढील आठवडय़ात चर्चा करून कपातीचा निर्णय घेतला जाईल, असे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp responsible for water shortage in the city says chhagan bhujbal zws