नंदुरबार – जिल्ह्यात झालेल्या चारही नगरपरिषदांच्या निवडणूकांमधून भाजपला जबर पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. जिल्ह्यातील एकाही नगराद्यक्षपदी भाजपचा उमेदवार जिंकून येवू शकलेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक दयनीय अवस्था काँग्रेसची झाली असून नगरसेवक पदासाठीही कॉग्रेसला भोपळा फोडता आलेला नाही. शिंदे गटाने आपला नंदुरबारचा गड कायम ठेवला असून जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकत शिंदे गट प्रथमस्थानी आहे. मात्र तब्बल दोन नगरपालिकेवर सत्ता काबीज करुन अजित पवारांची राष्ट्रवादीने मुसंडी मारली एकूण चार नगरपरिषदांच्या ११४ नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक झाली. यात ३५ जागांवर विजय मिळवत शिवसेना शिंदे गट अव्वल ठरला. त्या पाठोपाठ भाजपला ३३ तर अजित पवार गटाचे ३१ नगरसेवक निवडून आले.
एमआयएमने नंदुरबार नगरपरिषदेमध्ये खाते खोलले असून त्याचे चार नगरसेवक निवडून आले. शरद पवार गटाचे दोन तर जनता विकास आघाडीचे नऊ नगरसेवक निवडून आले.नंदुरबार नगरपरिषदेच्या निकालात शिंदे गटाने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. याठिकाणी शिंदे गटाचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी विजयी झाल्या. तर ४१ पैकी २९ जागांवर शिंदे गट विजयी झाले. भाजपला अवघ्या आठ जागांवर समाधान मानावे लागले.
नंदुरबार नगरपरिषदेमध्ये यंदा एमआयएमने मुसंडी मारली. त्यांचे चार नगरसेवक निवडून आले. शहादा नगरपरिषदेमध्ये जनता विकास आघाडीच्या अभिजीत पाटील यांचा नगराध्यक्षपदी १०१४ मतांनी विजय झाला. याठिकाणी भाजपचे तब्बल २० नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभुत झाल्याने गड आला आणि सिंह गेला अशी स्थिती भाजपाची झाली आहे. या ठिकाणी २९ पैकी भाजपा २० ठिकाणी तर जनता विकास आघाडी अवघ्या नऊ जागांवर विजयी झाली. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या भाग्यश्री चौधरी यांचा ४४७३ मतांनी विजय झाला आहे.
भाजपातून बंडखोरी करत भाग्यश्री चौधरी आणि त्यांचे पती योगेश चौधरी हे राष्ट्रवादीमध्ये दाखल होत त्यांनी पॅनल उभे केले होते. अत्यंत चुरशीच्या आणि तिरंगी ठरलेल्या या लढतीत नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री चौधरी यांनी बाजी मारली आहे. या ठिकाणी ११ जागांवर राष्ट्रवादी शिवसेना सहा तर भाजप चार जागांवार विजयी झाले . भाजपचे तळोदा शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांना घराच्या मैदाणावर पराभवाचा धक्का बसला आहे.
नवापूर नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जयवंत जाधव यांचा ३६२५ मतांनी विजय झाला आहे. त्यांनी जिल्हा विकास आघाडीच्या विश्वास बडोगे यांचा पराभव केला. याठिकाणी कॉग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. कॉग्रेस आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वात याठिकाणी कॉग्रेसची सत्ता होती. तिला उलटविण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे. विशेष म्हणजे नवापूर नगर परिषदेमध्ये कॉग्रेसला एकाही जागेवर विजय संपादीत करता आलेला नाही. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाला २० जागावर विजय मिळाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाला दोन तर भाजपाला एका जागेवर विजय मिळालेला आहे. राष्ट्रवादीचे भरत गावित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने याठिकाणी दमदार विजय संपादीत केला आह.
