धुळे : येथील महापालिका निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून शहरात राजकीय वातावरण तापले आहे. विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, आरोप-प्रत्यारोप, रोड शो आणि प्रचार फेऱ्यांमुळे निवडणूक रणधुमाळी रंगली आहे. अशाच पार्श्वभूमीवर मंगळवार (दि. ६) रोजी दुपारी भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

धुळे महानगरपालिकेच्या १९ प्रभागांतील ७४ जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यापैकी चार जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित ७० जागांसाठी चुरशीची लढत होत आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष विजयासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत सुरुवातीला माजी खासदार सुभाष भामरे व आमदार अनुप अग्रवाल यांनी भाषणे केली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या भाषणानंतर मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण अपेक्षित होते, मात्र त्यांनी भाषण न करता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंचावर येण्याची विनंती केली. यामुळे काही क्षण सभास्थळी शांतता पसरली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात करताना सांगितले की, मंत्री गिरीश महाजन यांनी सातत्याने अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्यामुळे त्यांचा आवाज बसला असून त्यांना एक दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मंत्री महाजन हे फक्त निवडणुकीचाच आकडा काढतात, दुसरा आकडा काढत नाहीत, यामुळे त्यांनी धुळ्याचाच आकडा न काढता इतर ठिकाणचेही आकडे काढून आम्हाला विजयी करावे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी मागील निवडणुकीची आठवण करून देत सांगितले की, मागील वेळी ‘५० प्लस’चा नारा देण्यात आला होता आणि भाजपला ५१ जागांवर विजय मिळाला होता. यंदा भाजपने ‘५५ प्लस’चे उद्दिष्ट ठेवले असून धुळेकरांनी केवळ धुळ्यातच नव्हे तर इतर ठिकाणीही भाजपला विजयी करण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

धुळे महापालिकेत यापूर्वी भाजपची सत्ता होती. यंदा भाजप स्वबळावर निवडणूक लढवत असून मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. त्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणे आणि नेत्यांची भाषणे मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेमुळे धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिक वेग मिळाल्याचे चित्र आहे.

धुळे महापालिका निवडणुकीत यंदा विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, रोजगार आणि औद्योगिक गुंतवणूक हे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. भाजपकडून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, अमृत योजना, घरकुल योजना आणि शहराच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर टीका केली जात आहे. शहरातील मतदारांमध्ये महापालिकेच्या पुढील पाच वर्षांच्या कारभाराबाबत उत्सुकता वाढली असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नेत्यांची भाषणे, आश्वासने आणि राजकीय समीकरणे निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.