नाशिक – मंत्रालयातील कार्यालयात कर्मचाऱ्याच्या लाचखोरीमुळे अडचणीत आलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी अलीकडेच खासगी सचिव रामदास गाडे यांनाही आपल्या स्वीय सहायक पदावरून कार्यमुक्त करुन त्यांची मूळ विभागात रवानगी केली होती. तुर्तास झिरवळ यांचे मंत्रिपद शाबूत आहे. दुसरीकडे भाजपने आता झिरवळ यांना दिंडोरी मतदारसंघातील कारभारावरून घेरण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात वर्चस्व राखणारा राष्ट्रवादी अजित पवार गट हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. ग्रामीण, आदिवासीबहुल भागात या पक्षाचे एकहाती वर्चस्व आहे. त्याखालोखाल भाजपचे पाच आमदार असले तरी यातील तीन नाशिक शहरातील तर उर्वरित केवळ दोन चांदवड आणि सटाणा या ग्रामीण भागातील आहेत.
मित्रपक्षाच्या मतदारसंघातील कमकुवत धागेदोरे शोधण्यात भाजपची मंडळी सक्रिय झाल्याचे दिंडोरीतील घटनाक्रमातून समोर येत आहे. नरहरी झिरवळ हे प्रदीर्घ काळापासून दिंडोरी-पेठ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिकमध्ये् तीन मंत्री होते. यातील माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर दुसरे मंत्री झिरवळ हे अडचणीत आले.
मंत्री झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्यानंतर विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणाशी आपला संबंध आढळल्यास राजीनामा देण्याची तयारी झिरवळांनी दाखवली. मित्रपक्षाच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात कारवाई केली केल्याची साशंकता तेव्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली होती. आता भाजपचे पदाधिकारी उघडपणे झिरवळ यांच्या विरोधात मैदानात उतरल्याचे दिसत आहे.
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात अनेक गंभीर समस्या आहेत. सामान्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मतदारसंघातील मंत्री, त्याचे नातेवाईक आणि काही समर्थक चुकीचे राजकारण करीत असल्याच्या जनभावनेत तथ्य असल्याचे भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे. महायुती म्हणून सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. साामान्य नागरिकांची शासकीय व निमशासकीय कामे सहजसुलभ कशी होतील हे लोकप्रतिनिंधी पहावे, असे केदार यांनी म्हटले आहे.
