नंदुरबार – कथित ध्वनिफितीप्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या अडचणीत आता अधिक वाढ झाली आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांची बदनामी केल्याच्या गुन्ह्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार आमश्या पाडवी यांच्या तक्रारीवरुन चौधरीविरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबंधक कायद्याअंतर्गत (ॲट्राॅसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चौधरीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
नंदुरबारमधील ध्वनिफीत प्रकरण दररोज वेगवेगळे वळण घेत आहे. प्रारंभी याप्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री चौधरी यांनी त्यांचे खासगी सचिव यश टिपरे यांच्याविरुध्द तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतरही अनेक ध्वनिफिती बाहेर आल्या. माजी खासदार डॉ. हिना गावित यांना शिवीगाळ करणारी ध्वनिफीत बाहेर आल्यानंतर चौधरींविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबंधक कायद्या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तेव्हापासून चौधरी फरार असून त्यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयक पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी चौधरींचे स्वीय सहायक यश टिपरेला अटक केली. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला.
या सर्व घडामोडी घडत असतांना रोज नव्या ध्वनिफिती समाज माध्यमांद्वारे पुढे येत आहेत. अशातच अक्कलकुव्याचे आमदार आमश्या पाडवी यांच्या विषयीदेखील आक्षेपार्ह वक्तव्य करणारी ध्वनिफीत बाहेर आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील चौधरीविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबंधक कायद्या अंतर्गत अक्कलकुवा पोलिसांत तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला. अजून एका ध्वनिफितीतून सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य झाल्याने वळवी यांनी तक्रार केल्यावर चौधरीविरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला. आदिवासी संघटनांनी चौधरीच्यां पुतळ्याचे दहन केले आहे.
दुसरीकडे धुळे जिल्ह्यात देखील आमदार अमरिश पटेल यांची ध्वनिफितीतून बदनामी झाल्याने त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ झाले आहेत.
