मालेगाव : विकास कामांसाठी शिंदे गटावर पालिकेला टाळे ठोकण्याची वेळ| block the municipality on the Shinde group for development works malegaon nashik | Loksatta

मालेगाव: विकास कामांसाठी शिंदे गटावर पालिकेला टाळे ठोकण्याची वेळ

सन २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सर्वसाधारण निधीतून शहरातील पश्चिम भागासाठी एकूण २७ कोटीची विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

block the municipality on the Shinde group for development works malegaon nashik

महापालिकेतील प्रशासकीय उदासीनतेमुळे शहराच्या पश्चिम भागातील विकास कामे रखडल्याची ओरड करत हल्लाबोल आंदोलन करणाऱ्या शिवसेनेने (बाळासाहेब गट) येथील प्रभाग कार्यालयास टाळे ठोकले. राज्यात सत्तेत असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळणाऱ्या शिवसेना बाळासाहेब गटावर महापालिकेस टाळे ठोकण्याची वेळ आल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सन २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सर्वसाधारण निधीतून शहरातील पश्चिम भागासाठी एकूण २७ कोटीची विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मात्र आर्थिक वर्षातील सात महिन्याचा कालावधी उलटला तरी ही कामे अद्याप सुरु होऊ शकली नाहीत. गेल्या जून महिन्यात मुदत संपल्याने व निवडणुका लांबल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्याकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करुन देखील कामे सुरु करण्याची प्रक्रिया सुरु होत नाही. त्यामुळे लोकांच्या रोषाला बळी पडावे लागत असल्याची आंदोलनकर्त्यांची तक्रार आहे.

हेही वाचा: मालेगाव: खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्याची पोलिसांंकडून सुटका

या प्रश्नी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयापासून प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी करत प्रभाग- एक कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढत प्रवेशद्वारास टाळे ठोकले. यावेळी काही आंदोलकांनी प्रभाग अधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. तसेच खुर्च्या फेकून दिल्या. स्वत: आयुक्तांनी जागेवर येऊन विकास कामे सुरु करण्यासंदर्भात ठोस ग्वाही दिली,तरच टाळे उघडण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. अखेरीस अप्पर आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सुहास जगताप व साहाय्यक आयुक्त राजू खैरनार यांनी लवकरच प्रस्तावित कामे सुरु करण्यात येतील,असे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सखाराम घोडके व नीलेश आहेर हे दोघे माजी उपमहापौर, राजेश गंगावणे, प्रमोद पाटील, राजेश अलिझाड,विनोद वाघ, केवळ हिरे, ताराचंद बच्छाव आदी सामिल झाले होते.

हेही वाचा: ‘सेल्फी विथ शौचालय’, ऑनलाईन स्पर्धेचा विषय ऐकताच शिक्षकही चक्रावले; पत्रकाचा नाशकातील शिक्षकांकडून निषेध

काही दिवसांपूर्वी विकास कामांसाठी ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली येथील जूना आग्रा रस्त्यावर आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त गोसावी यांच्या अंगावर गटाराचे पाणी आणि गरम चहा फेकण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर तेथे १६ कोटी खर्चाचे काम सुरु झाले आहे. हा संदर्भ देत कामे होण्यासाठी आंदोलनाचाच मार्ग अनुसरावा का, असा सवाल उपस्थित करण्याचा प्रयत्न सेनेतर्फे करण्यात आला.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-11-2022 at 13:05 IST
Next Story
मालेगाव: खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्याची पोलिसांंकडून सुटका