जळगाव : शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या मोबदल्यात पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव येथील पथकाने ६०० रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील पंचायत समिती कार्यालयांतील कामकाजाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तक्रारदार हे ५२ वर्षीय वाद्य कलाकार असून त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळावा म्हणून ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज दाखल केला होता. नियमानुसार अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती बोदवड येथे जमा करण्यात आली होती. या अर्जाची छाननी करून प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठविण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे होती.
प्रस्ताव पाठविण्यासाठी ३ हजार रुपयांची मागणी
मागील आठवड्यात तक्रारदार अर्जाच्या चौकशीसाठी पंचायत समिती कार्यालयात गेले असता, तेथील कनिष्ठ सहाय्यक उमेश शामकांत सपकाळे (४९) यांनी प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. सरकारी काम करून देण्यासाठी लाच मागितल्याने तक्रारदारांनी ३० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार नोंदविली.
एसीबीने केली तक्रारीची पडताळणी
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान संशयित उमेश सपकाळे यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करण्यासाठी ६०० रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे लाच मागितल्याची तक्रार प्रथमदर्शनी सत्य असल्याचे निष्पन्न झाले.
६०० रुपयांची लाच स्वीकारताच कारवाई
पडताळणीनंतर एसीबीने त्याच दिवशी पंचायत समिती बोदवड कार्यालयात सापळा रचला. कार्यालयातील सामान्य प्रशासन शाखेबाहेरील गॅलरीमध्ये तक्रारदारांकडून आरोपीने ६०० रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले. संपूर्ण कारवाई पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संशयिताला अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा
ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी कारवाईचे नेतृत्व केले, तर पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी पर्यवेक्षण केले. कारवाईत पोहेकॉ बाळू मराठे, पोकॉ राकेश दुसाने आणि पोकॉ अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
