नाशिक : पुस्तके, वह्या, दप्तरांसह छान सजवलेला वर्ग. अगदी काही नसले तरी कौलारू खोली. अभ्यासासाठी हे सर्व प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजही शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित असणाऱ्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. शहर असो वा ग्रामीण, आदिवासी दुर्गम परिसर, शिक्षणाचा गुंता सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर येथील श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने बुक क्लब हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
वर्षभरात या उपक्रमाशी २०० मुली जोडल्या गेल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशोत्सवाचे कवित्व आता संपले आहे. आजही आदिवासी पाडे, ग्रामीण भाग, शहरातील काही मुले व मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर फेकली गेली आहेत. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, कारणे वेगळी. याबाबत श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेच्या वतीने काही ठिकाणी सर्व्हेक्षण करण्यात आले. घरात तीन-चार मुली आहेत.
गरजेपुरता लिहिता वाचता आल्याववर मुलींना शेतमजुरी, घरकाम, कामगार म्हणून कामावर पाठविण्यात आले. काहींना एकल पालकत्वामुळे आलेला ताण, आर्थिक परिस्थिती, शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नसणे तसेच मुलगी चार भिंतीच्या आतच बरी, अशा कारणांमुळे काही जण आजही मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचे संस्थेच्या माया खोडवे यांनी सांगितले. पैशांमुळे शिक्षण थांबू नये, यासाठी संस्थेने समाजातील काही दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेतले, काहींकडून सामाजिक दायित्व निधीतून पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला. यातून बुक क्लब उपक्रम आकारास आला.
बुक क्लबच्या माध्यमातून हरसूल परिसरातील कडवळीपाडा, घनशेत, खर्डेपाडा, बोर्डेपाडा, पळशी, आगपिटी, गावंद या ठिकाणी १० ते १८ वयोगटातील २०० हून अधिक मुली या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या. यामध्ये घरकामगार, कचरा वेचक, असंघटित क्षेत्रातील कष्टकरी एकल महिलांच्या मुलींचा सहभाग आहे. आठवी, नववीपर्यंत कशातरी शिकणाऱ्या मुलींना महाविद्यालयीन शिक्षण कठीण वाटत होते.
परंतु, संस्थेने मदतीचा हात दिल्याने पैशांअभावी महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग अडलेल्या आठ मुली यंदा अकरावीत प्रवेश घेत आहेत. दुसरीकडे, गावातील १० ते १८ वयोगटातील मुलींसाठी कौशल्य विकास योजना राबवली जात आहे. याव्दारे वाचन, गणित, इंग्रजी यावर भर देण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला कौशल्य वाढीसाठी प्रयत्न होत आहे. या काळात संस्थेच्या वतीने वह्या, पुस्तके यासह अन्य शैक्षणिक साहित्य दिले जात आहे. गावातील लोकांमध्ये शिक्षणाचे महत्व रुजावे, यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे.