संमेलनस्थळी पुस्तक प्रकाशन मंच, मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

नाशिक : तीन ते पाच डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखकांना त्यांचे पुस्तक विनाशुल्क पुस्तक प्रकाशित करता येणार आहे. संमेलनात पुस्तक प्रकाशनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या लेखकांचा सन्मानही केला जाणार आहे. संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. संमेलनात पुस्तक प्रकाशित करण्यासाठी नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या अर्जामध्ये संबंधित लेखक आणि प्रकाशकांची प्राथमिक माहिती आणि पुस्तकाबाबतचा तपशील विचारण्यात आला आहे. या व्यतिरिक्त संबंधित लेखकाकडून एक हमीपत्रही भरून घेतले जाणार आहे. ज्यामध्ये स्वामीत्व हक्क,  प्रकाशनासंदर्भातील तांत्रिक बाबी आणि करोना संदर्भातील दक्षता यासंबंधीची हमी आहे.

अन्य ठिकाणी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावर होणारा खर्च टाळण्याच्यादृष्टीने संयोजकांकडून ही व्यवस्था करण्यात आली असून येथे पुस्तक प्रकाशन मंचची उभारणी केली जाणार आहे, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक व प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, कार्यक्रम समन्वयक समीर भुजबळ, संयोजन समन्वयक विश्वास ठाकूर, कार्यवाह डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी दिली.

ज्येष्ठ साहित्यिक- मान्यवर विचारवंतांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन केले जाणार आहे. अधिकाधिक साहित्यिकांनी आपले पुस्तके संमेलनात प्रकाशित करावे, असे आवाहन ग्रंथ प्रकाशन समितीचे प्रमुख सुभाष सबनीस, उपप्रमुख प्रविण जोंधळे, विजयकुमार मिठे यांनी केले आहे.