धुळे : बोरविहीर–नरडाणा रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी प्रशासनाकडून जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप कलमाडी शिवारातील शेतकऱ्यांनी केला आहे.

आज (दि. २) सकाळी अकरा वाजता कलमाडी–माळीच शिवारात रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा महसूल यंत्रणेतील अधिकारी मोठ्या कुमकेसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले. यावेळी या शिवारातील गट क्रमांक ५६ मधील शेतात गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली. शेतमालक विठ्ठल पुंडलिक पाटील, मालुबाई विठ्ठल पाटील व अनंत विठ्ठल पाटील (देसले) हे शेतात उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून जबरदस्तीने जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सांगितले की, त्यांच्या शेतजमिनीचे रेल्वे प्रकल्पामुळे दोन तुकडे झाले आहेत. तसेच संबंधित जमीन बागायती स्वरूपाची असताना प्रशासनाकडून कोरडवाहू जमिनीप्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे बागायती जमिनीप्रमाणे योग्य दराने भरपाई मिळावी, तसेच शेताचे तुकडे झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची स्वतंत्र भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“आम्हाला न्याय मिळालेला नाही. योग्य मोबदला व नुकसानभरपाई मिळाली नाही, तर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल,” अशी भावना संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, रेल्वे प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विभाजित होत असून शेती व्यवसायावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतीसाठीचे रस्ते, पाण्याची सोय तसेच सिंचन व्यवस्था विस्कळीत होणार असल्याने भविष्यात शेती करणे कठीण होईल, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. योग्य पंचनामे न करता आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी न करता प्रशासनाकडून घाईगडबडीत कारवाई होत असल्याचा आरोपही करण्यात आला.

याप्रकरणी प्रशासनाने शेतकऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्या हरकती व मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बागायती जमीन, तुकडे झालेली शेती, सिंचन सुविधा आणि भविष्यातील नुकसान यांचा विचार करून नव्याने मूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी पुढे येत आहे. अन्यथा आत्महत्या करण्याचा इशाराही यावेळी अनंत पाटील या शेतकऱ्याने दिला.

“आमची जमीन कलमाडी आणि माळीच गावांच्या सीमेवर आहे. आम्हाला शेजारच्या वाघाडी गावातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या दराप्रमाणेच वाढीव मोबदला द्यावा. खरेतर रेल्वे मार्गाला आमचा विरोध नाही; मात्र शेतजमीन दिल्यानंतर एका शेतातून दुसऱ्या शेतात जाणेही कठीण होणार आहे. याशिवाय आमची जमीन बागायती असताना शासनाकडून ती कोरडवाहू म्हणून गृहीत धरून त्याप्रमाणे मोबदला दिला जात आहे, हे योग्य नाही.” — अनंत विठ्ठल पाटील, शेतकरी, (रा. माळीच, ता. शिंदखेडा).