मालेगाव: देशाला व्यसनमुक्त करून विकसित भारत घडवण्याच्या दिशेने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सुमारे १० कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान आयोजित करण्यात आले आहे. दादी प्रकाशमणी यांच्या स्मृतीनिमित्त ६ ते २० ऑगस्ट २०२६ या कालावधीत हे विशेष अभियान संपूर्ण देशभरात राबवले जाणार आहे.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या येथील केंद्र संचालिका शकुंतला दीदी, उज्वला दीदी व डॉ.मल्हार देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमासंदर्भात येथे माहिती दिली. देशभरात संस्थेच्या ८ हजार सेवा केंद्रांचे जाळे पसरले असून त्यांच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली आणि मूल्याधारीत समाज निर्मितीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून नशा मुक्तीचे हे अभियान राबविण्यात येत आहे. या निमित्ताने व्यसनमुक्त भारताच्या संकल्पात १० कोटी नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मालेगावात असे राबविले जाणार हे अभियान

मालेगाव येथील संस्थेच्या दोन्ही केंद्रांतर्फे शहर व तालुक्यात हे अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी १०० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. अभियान काळात शाळा,महाविद्यालये, प्रार्थना स्थळे तसेच वेगवेगळ्या प्रमुख आस्थापनांमध्ये नशामुक्तीसाठी जनजागृती केली जाणार आहे. तसेच विद्यार्थी व नागरिकांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रतिज्ञा दिली जाणार आहे. आजचे विद्यार्थी ही उद्याची पिढी असल्याने खास करून विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यासाठी काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी या अभियानाचा येथील बारा बंगला भागात शुभारंभ करण्यात येणार आहे.

नशा ही एक गंभीर समस्या

उपलब्ध आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे ३० लाख लोकांचा मृत्यू नशेशी संबंधित कारणांमुळे होतो. इतकेच नाही तर, कौटुंबिक वादांमागे ४० ते ६० टक्के कारण हे व्यसनच असते. वेगवेगळ्या नशांमुळे कुटुंबाच्या उत्पन्नातील २० ते ३० टक्के हिस्सा वाया जातो, ज्याचा थेट परिणाम कौटुंबिक आर्थिक घडीवर होतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या व्यसनाधीनतेचा सर्वाधिक फटका १५ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण पिढीला बसत आहे. ​या समस्येवर मात करण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेने नागरिकांना या महाअभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना क्यूआर कोड देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या माध्यमातून नशामुक्तीची ऑनलाईन प्रतिज्ञा नोंदवता येणार आहे. केवळ स्वतः प्रतिज्ञा न घेता, आपल्यासोबत किमान ५० इतर लोकांनाही या महाअभियानाशी जोडून नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.