नाशिक – महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया व उपचाराअंती रुग्णालयातून सोडण्यासाठी ३० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील २० हजार रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणात नामको कॅन्सर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाखा जहागिरदार यांच्यासह रोखपाल व अन्य महिला कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने वैद्यकीय उपचारासाठी असणाऱ्या शासकीय योजनेत रुग्णाच्या कुटुंबियांची कशी आर्थिक पिळवणूक केली जाते, यावर प्रकाश पडला आहे.
तक्रारदार हे पिवळे शिधापत्रिकाधारक असून त्यांच्या पत्नीवर पेठ रस्त्यावरील नामको कॅन्सर रुग्णालयात शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत शस्त्रक्रिया झाली होती. तीन मे रोजी उपचाराअंती रुग्णालयातून सोडण्यासाठी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाखा जहागिरदार यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी नऊ हजार रुपये स्वीकारले.
या संदर्भात तक्रार आल्यानंतर सात मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागणी पडताळणी कारवाई केली. तेव्हा संशयितांनी २१ हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी ११ हजार रुपये स्वीकारले. यावेळी डॉ. जहागिरदार यांच्या कक्षात गायत्री सोमवंशी ही महिला कर्मचारी उपस्थित होती. या प्रकरणी संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागणी पडताळणीतील रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. तर डॉ. जहागिरदार व रुग्णालयातील महिला रोखपाल यांचे भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आले नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागने म्हटले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधिक्षक स्वाती पवार यांनी सापळा अधिकारी म्हणून काम केले. पथकात पोलीस हवालदार शरद हेंबाडे, हवालदार युवराज खांडवी, राजश्री अहिरराव व परशराम जाधव यांचा समावेश होता. दरम्यान, गोरगरिबांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळतात. परंतु, शासकीय योजनेंतर्गत खासगी रुग्णालये वेगवेगळ्या नावाखाली रुग्णांच्या कुटुंबियांकडून पैसे उकळतात, अशा नेहमीच तक्रारी होतात. या कारवाईने नामकोसारख्या रुग्णालयातही असे प्रकार सुरू असल्याचे समोर आले.