जळगाव : जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत असताना, पिंपळगाव (ता. पाचोरा) येथील उपकृषी अधिकाऱ्याला शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना खासगी पंटरसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांकडून संबंधित कृषी अधिकाऱ्यासह दोन खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लिलाधर शिवाजीराव देशमुख (उपकृषी अधिकारी, पिंपळगाव), खासगी व्यक्ती संजय प्रभाकर पाटील आणि नितीन इंदलसिंग निकम (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा), अशी शेतकऱ्याकडून पाच हजाराची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तक्रारदार जोगेवडगाव (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, त्यांनी शासनाकडून कृषी अवजारांच्या खरेदीसाठी मिळणाऱ्या अनुदानाच्या मंजुरीकरिता पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज केला होता. सदर कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी स्वखर्चाने रोटाव्हेटर तसेच नांगर खरेदी देखील केला. मात्र, खरेदी केलेल्या साहित्यासह पिंपळगाव येथील उपकृषी अधिकारी यांच्यासोबत छायाचित्र काढून ते पुन्हा संकेतस्थळावर अपलोड झाले नव्हते. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याला अनुदान मिळण्यात अडचण आली होती.
तक्रारदार शेतकरी पिंपळगाव येथील उपकृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे सहा हजार रूपये लाचेची मागणी करण्यात आली. आणि लाचेची रक्कम आंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचे संचालक संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार शेतकऱ्याने त्याची तक्रार जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार, सोमवारी पंचांसमक्ष पडताळणी केली असता उपकृषी अधिकारी देशमुख यांनी रोटाव्हेटर आणि नांगराचे छायाचित्र काढून ते संकेतस्थळावर अपलोड करून अनुदान मिळवून देण्यासाठी सहा हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजाराची लाच स्वीकारण्याचे मान्य करून ती आंबेवडगाव येथील संजय पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले.
मात्र, तक्रारदार शेतकरी आंबेवडगाव येथे गेल्यावर संजय पाटील जागेवर नव्हते. त्यामुळे देशमुख यांनी लाचेची रक्कम त्या ठिकाणी उपस्थित नितीन निकम यास देण्यास सांगितली. त्यामुळे उपकृषी अधिकारी लिलाधर देशमुख यांच्यासह खासगी व्यक्ती संजय पाटील आणि नितीन निकम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने यांनी यशस्वी केली.

