नाशिक : ध्रुवनगर परिसरात गृहनिर्माण प्रकल्पात पाण्याची टाकी कोसळून चौघांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेत अटक केलेल्या चार संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील फरार झालेला बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ध्रुवनगर परिसरात श्वेता इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड हाऊसिंग कंपनीतर्फे साकारल्या जाणाऱ्या सम्राट ग्रुप अपना घर गृहनिर्माण प्रकल्पाच्या आवारात मंगळवारी सकाळी ही दुर्घटना घडली होती. कामगार, मजुरांसाठी कच्च्या बांधकामात पाण्याच्या दोन टाक्या बांधण्यात आल्या होत्या. त्यांच्या सभोवताली नळ बसवलेले होते.

सकाळी मजूर तिथे आंघोळ, महिला कपडे धूत असताना एक टाकी फुटली आणि ढिगाऱ्याखाली सहा ते सात जण सापडले. त्यात एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. बांधकाम व्यावसायिकाने परवानगी न घेता कच्च्या बांधकामात अनधिकृत टाकी बांधल्याचे उघड झाले आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुण नियंत्रण विभागाची मदत घेतली.

त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून आशीष सिंग या ठेकेदाराने फ्लाय अ‍ॅश विटा आणि सिमेंटचे कच्चे बांधकाम केले. तसेच हे बांधकाम धोकादायक आहे हे माहिती असताना प्रकल्प व्यवस्थापक सचिन शेवडे आणि अभियंता नारायण कडलग यांनी निष्काळजीपणे बांधकाम केले.

टाकीला तडे गेले असताना त्यात पाणी भरून कामगारांच्या सुरक्षिततेला आणि जीविताला धोका निर्माण होईल हे माहीत असताना निष्काळजीपणा केला. चार जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुजॉय गुप्ता फरार असून अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. संशयित भाविन पटेल, आशीष सिंग, सचिन शेवडे आणि नारायण कडलग या चार जणांना पोलिसांनी अटक केली होती. संशयितांना बुधवारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

मजुरांची नोंदणी नाही

कंपनीचे सुजॉय गुप्ता यांनी ठेकेदार रौनक इन्फ्राचे भाविन पटेल यांना कामगारांसाठी कच्च्या बांधकामाची परवानगी दिली होती. संशयित भाविन पटेलने मजुरांना आणून त्यांची कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी केली नाही.