मराठवाडा, वैदर्भीय, उत्तर महाराष्ट्रातील खाद्यपदार्थाची मेजवानी

अनिकेत साठे

नाशिक : साहित्य संमेलनात साहित्यप्रेमींचा सहभाग वाढविण्यासाठी ‘हात दाखवा, बस थांबवा’ या उपक्रमाच्या जोडीला रुचकर भोजन, अल्पोपाहार, चहा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठवाडा, वैदर्भीय, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांतील खाद्यपदार्थानी राज्यातील साहित्यप्रेमींना तृप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

मराठी साहित्य संमेलन पुढे ढकलले गेल्यामुळे ऋतुमानानुसार खाद्यपदार्थातही बदल करावे लागले आहेत. गेल्यावेळी मार्चच्या अखेरीस म्हणजे टळटळीत उन्हात संमेलन होणार होते. आता ते हिवाळय़ात होत असल्याने वातावरणास अनुरूप पदार्थानी साहित्यप्रेमींचे आदरातिथ्य करण्यात येणार आहे. संमेलनस्थळ शहरापासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर आहे. तिथे महामार्गावरील ढाबे व हॉटेल वगळता नाश्ता, भोजनासाठी पर्याय नाही. त्यामुळे संमेलनस्थळातील व्यवस्थेवर साहित्यप्रेमी पूर्णपणे अवलंबून असणार आहेत. हे लक्षात घेऊन संमेलनस्थळी स्वस्तात भोजन, चहा, नाश्ता दिला जाणार आहे. संमेलनास आलेल्या महिलांना पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करण्याची वेळ येऊ नये, असाही उद्देश यामागे आहे. त्यामुळे अतिशय माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती भोजन आणि अल्पोपाहार समितीचे प्रमुख उमेश मुंदडा यांनी दिली.

संमेलनातील विविध समित्यांचे पदाधिकारी व सदस्य, स्वागत समिती सदस्य, पुस्तक विक्रेते, विविध भागांतून येणारे नोंदणीकृत प्रतिनिधी यांच्या भोजनासाठी तीन दिवसांची एकत्रित कूपन पद्धत असेल. तथापि, एक- दोन दिवस किंवा सलग तीन दिवस संमेलनात येणाऱ्यांना चहा, अल्पोपाहार आणि भोजन एकत्रित किंवा स्वतंत्रपपणे अतिशय कमी दरात देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकरून त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही. संमेलनस्थळी अल्पोपाहारासाठी स्वतंत्र कक्ष महिला बचत गटांना देण्यात आले आहेत. तिथेही खाद्यपदार्थाचे दर कमी असतील, याची काळजी घेतली जाणार असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी

संमेलनात तीन दिवसांत साधारणत: २० ते २५ हजार साहित्यप्रेमी सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यांची भोजन व्यवस्था करताना अन्नाचा एकही कण वाया जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. ताट हाती घेतल्यापासून भोजन होऊन ते ठेवेपर्यंत स्वयंसेवकांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे. ‘जेवढे आवडते, तेवढेच घ्या, जे लागेल ते वारंवार घ्या’ असे आवाहन स्वयंसेवकांकडून केले जाणार आहे. मुख्य भोजन कक्षाची क्षमता एक हजार तर महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या भोजन कक्षाची क्षमता ३०० जणांची आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रासाठी स्वतंत्रपणे ज्येष्ठांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.