नाशिक: करोना काळातील परिस्थितीमुळे बिघडलेली व्यवसायाची घडी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या सर्व साहित्याचे दर ३० टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. याचा संपूर्ण भार ग्राहकांवर पडणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे, असा सल्ला भोजन सेवा व्यावसायिकांच्या राष्ट्रीय महासंघाचे सचिव किरीट बुद्धदेव यांनी दिला. भोजन सेवा (कॅटिरग) पुरविणाऱ्या व्यावसायिक संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन आणि प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय महासंघाचे कोषाध्यक्ष समीर पारेख, सहसचिव देवेंद्र कोटेचा, दक्षिण विभागाचे प्रमुख अतुल मेहता, महाराष्ट्र राज्य भोजन सेवा व्यावसायिक संघटनेचे सचिव विपूल बधियानी, उपाध्यक्ष दादूभाई पुरोहित, महेश लाहोटी, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम जयपुरिया, नाशिक शाखेचे अध्यक्ष उत्तम गाढवे, अनिल जोशी आदी उपस्थित होते.
मागील काही महिन्यांत तेल, साखर आणि तत्सम अन्न धान्याच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या महागाईचा परिणाम विवाह तसेच तत्सम सोहळय़ातील खाद्य पदार्थाच्या दरावरही होत आहे. अधिवेशनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावर भाष्य केले. व्यावसायिकांनी नियोजन केल्यास ग्राहकांवर कमी भार पडेल, असे बुध्ददेव यांनी सूचित केले. करोना काळात देशभरातील असंख्य भोजन सेवा पुरवठा व्यावसायिकांनी हजारो गरजूंना मोफत अन्न पुरविल्याबाबत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. संघटनेचा उपयोग हा सकारात्मक कार्यासाठी तसेच एक दुसऱ्यासोबत सौहार्दपूर्ण वातावरण निर्मितीसाठी झाल्यास सर्वच सदस्य व्यावसायिक प्रगती करू शकतील असेही ते म्हणाले.