जळगाव : जिल्ह्यातील बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग येत असतानाच रावेरसह यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांतील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग प्रकल्पांतर्गत या चारही शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना प्रारंभ केला जाणार आहे. यामुळे संबंधित शहरांतील अंतर्गत वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि गतिमान होण्याबरोबरच व्यापारी व दैनंदिन दळणवळणालाही मोठी चालना मिळणार आहे.
प्रस्तावित कामांच्या नियोजनासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा बैठक घेतली. बैठकीत रावेरसह यावल, फैजपूर आणि सावदा शहरांतील प्रस्तावित समांतर रस्त्यांचे आराखडे, वाहतुकीचा ताण, शहरांची वाढती लोकसंख्या, व्यावसायिक भागांतील वाहतुकीची स्थिती तसेच स्थानिक नागरिकांच्या मागण्या यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक शहरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन कामांचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, मंजूर कामांसाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली जाणार आहे. कामांचा दर्जा, वेळेचे नियोजन आणि नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल, यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
काँक्रीटीकरणासाठी केंद्राकडे पाठपुरावा
सध्या बऱ्हाणपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम विविध टप्प्यांमध्ये वेगाने सुरू आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना जोडणारा हा महामार्ग उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भविष्यात या मार्गावरील वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरांतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा या शहरांना वळसा घालणारे बाह्यवळण मार्ग विकसित करण्यात येत आहेत. मात्र, बाह्यवळण मार्ग तयार झाल्यानंतर शहरांतील विद्यमान मुख्य रस्त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष होण्याची भीती नागरिक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती. शहरातील बाजारपेठा, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि निवासी भाग यांना जोडणारे मुख्य रस्ते मजबूत करणे आवश्यक असल्याची मागणी सातत्याने पुढे येत होती. या पार्श्वभूमीवर, समांतर रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांना लाभ
स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, शेतकरी आणि विविध सामाजिक संस्थांनीही शहरांतील रस्त्यांच्या उन्नतीकरणाची आवश्यकता प्रस्तावातून अधोरेखित केली होती. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्तावांचा अभ्यास करून चारही शहरांतील समांतर मुख्य रस्त्यांच्या काँक्रीटीकरणास मंजुरी दिली. या कामांमुळे शहरांतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे, चिखल आणि वाहतुकीतील अडथळे मोठ्या प्रमाणात कमी होतील. रुग्णवाहिका, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक तसेच मालवाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे होऊ शकेल.
कृषी अर्थव्यवस्थेलाही चालना
समांतर रस्ते मजबूत झाल्याने नागरिकांची प्रवासाचा वेळ कमी होण्यासह इंधनाची बचतही होणार आहे. रावेर, यावल, फैजपूर आणि सावदा ही शहरे केळीसह विविध कृषी उत्पादनांची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जातात. परिसरातील हजारो शेतकरी दररोज या शहरांमध्ये कृषी मालाची आवक करतात. दर्जेदार अंतर्गत रस्ते उपलब्ध झाल्यास कृषी मालाच्या वाहतुकीला गती मिळेल, व्यापारी व्यवहार अधिक सुलभ होतील आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
