जळगाव : उत्तर महाराष्ट्राला गुजरात व मध्य प्रदेशाशी थेट जोडणारा बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-७५३ बी) प्रकल्प पुन्हा एकदा गती पकडताना दिसत आहे. अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या हरकती, प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक अडचणींमुळे रखडलेला हा प्रकल्प आता भूसंपादनाच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि चोपडा तालुक्यांतून हा महामार्ग प्रस्तावित आहे.
बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग तीन राज्यांतील महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. ज्यामध्ये गुजरातमधील सात गावे, महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व शहादा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुके तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील तीन गावे समाविष्ट आहेत.
या महामार्गामुळे सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या कृषी प्रधान आणि सीमावर्ती भागातील तालुक्यांना राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडणी मिळणार असून, औद्योगिक आणि व्यापारी हालचालींना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) यापूर्वीच जमिनी संपादित करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती.
प्रारंभी शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी भरपाई, रस्त्याची दिशा, शेतीच्या तुकडीकरणासंदर्भातील हरकती दाखल केल्या होत्या. त्यामुळे प्रकल्प अनेक वर्षे कागदोपत्रीच राहिला.मात्र, अलीकडे प्रशासनाने संवादाची भूमिका घेत हरकतींचे टप्प्याटप्प्याने निराकरण केले. भरपाई दरांबाबत स्पष्टता देण्यात आल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार संयुक्त मोजणी सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चोपडा तालुक्यानंतर यावल ते सावदा या टप्प्यापर्यंतची संयुक्त मोजणी व सीमांकन प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या भागात जमिनीची हद्द निश्चित करण्यात आली असून, संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र, सावदा ते रावेर दरम्यानची मोजणी भुमिअभिलेख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे थांबली आहे. संप लवकर मिटल्यास उर्वरित मोजणी पूर्ण करून भूसंपादन अंतिम टप्प्यात नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
आर्थिक व विकासात्मक परिणाम
बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील केळी, कापूस, ऊस, मका यांसारख्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला भविष्यात मोठी गती मिळणार आहे. सध्या अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, वळणे, खड्डे आणि वाहतुकीचा ताण यामुळे वेळ व इंधनाचा खर्च वाढतो. चौपदरीकरणामुळे मालवाहतूक सुलभ होऊन उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल.
तसेच सीमाभागातील पर्यटनस्थळे आणि व्यापारी केंद्रांनाही थेट संपर्क मिळणार आहे. गुजरातमधील औद्योगिक पट्टा आणि मध्य प्रदेशातील बाजारपेठांपर्यंत जलद पोहोच शक्य होणार असल्याने हा मार्ग आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.
दिवाळीनंतर कामाला प्रारंभ?
बऱ्हाणपूर–अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्ते बांधणीचे काम तातडीने सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास दिवाळीनंतर या महामार्गाच्या कामाला मुहूर्त मिळू शकतो.
या दरम्यान, महामार्गासाठी संपादित होणे बाकी असलेल्या उर्वरित मोजणी पूर्ण करणे, शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर भरपाई देणे, पर्यावरणीय आणि तांत्रिक मान्यतांची पूर्तता करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे. भूसंपादन प्रक्रिया वेगात सुरु असली तरी संपामुळे निर्माण झालेला अडथळा दूर होणे अत्यावश्यक आहे. प्रशासन, शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयावरच या प्रकल्पाचा अंतिम वेग अवलंबून राहणार आहे.

