जळगाव : नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यामुळे मोठ्या आवक घटल्याने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीच्या दरांनी मोठी झेप घेतली आहे. मागील चार दिवसांत आवक जवळपास निम्म्यावर आल्याने बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाला असून, केळीला चांगले दर मिळू लागले आहेत. मात्र, दरवाढीचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांनाच मिळताना दिसत आहे. बहुतांश केळी उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेरसह यावल, मुक्ताईनगर तसेच लगतच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. नैसर्गिक संकटामुळे काढणीसाठी तयार असलेल्या हजारो हेक्टरवरील केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे केळीची झाडे कोसळून बागा भुईसपाट झाल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या हाती येणारे उत्पादन नष्ट झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या परिस्थितीचा परिणाम थेट बाजारपेठेवर दिसून येत आहे. बऱ्हाणपूर बाजार समितीत चार दिवसांपूर्वी दररोज सुमारे १५० गाड्यांमधून केळीची आवक होत होती. मात्र, नैसर्गिक आपत्तीनंतर तिथे केळीची आवक थेट ८० गाड्यांपर्यंत घसरली आहे. म्हणजेच नियमित आवकेत जवळपास ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

दरम्यान, केळीची आवक कमी झाल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढल्याने दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीला सरासरी २३७१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. त्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दरात सुमारे ५०० रुपयांची वाढ होऊन रविवारसाठी केळीला २८७१ रुपये प्रति क्विंटल दर जाहीर करण्यात आला. बाजारातील ही तेजी केळी उत्पादकांसाठी सकारात्मक मानली जात असली, तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ फारच कमी शेतकऱ्यांना मिळत आहे. कारण, ज्यांच्या बागा आपत्तीमधून वाचल्या आहेत किंवा ज्यांचे उत्पादन आधीच बाजारात पोहोचले आहे, त्यांनाच वाढीव दराचा फायदा मिळत आहे.

दुसरीकडे, गारपीट व वादळामुळे ज्यांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी पुरेसा मालच उपलब्ध नसल्याने त्यांना दरवाढीचा कोणताही लाभ मिळू शकलेला नाही. उलट वाढता उत्पादन खर्च, बागांचे नुकसान आणि अपेक्षित उत्पन्न घटल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केळी पट्ट्यात झालेल्या नुकसानीमुळे आगामी काही दिवसांतही आवक कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बाजारातील दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी व बाजार अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.