काही प्रवासी किरकोळ जखमी

नाशिक : नाशिक-पेठ मार्गावरील कोटंबी घाटात सोमवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि मालमोटार यांची धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पेठ आगाराची बस नाशिकहून पेठकडे निघाली होती. कोटंबी घाटात गुजरातकडून नाशिककडे येणाऱ्या मालमोटारीने एका वळणावर बसला मागून धडक दिली. अपघातात मालमोटार उलटली. बसच्या एका बाजुचा पत्रा वाकला. शाळा, महाविद्यालय सुरू झाल्याने बसमध्ये २५ विद्यार्थी व अन्य प्रवासी असे एकूण ५० ते ६० जण होते. अपघाताने बसमध्ये गोंधळ उडाला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सुदैवाने अपघातात किरकोळ दुखापती वगळता प्रवाशी गंभीर जखमी झाले नाहीत.

अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी धाव घेतली. जखमी प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात  दाखल करण्यात आले. पुढील उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. नियमांकडे दुर्लक्ष करीत काही वाहने दामटली जात असल्याने या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणी मालमोटार चालक बहादुर  सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात प्रकरणी पेठ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.