इतर आगारांवरही बंदसाठी दबाव

नाशिक : राज्य परिवहनच्या १८ संघटनांनी एकत्र येत सुरू केलेला संप मिटण्याची चिन्हे दिसत नसून जिल्ह्यातील १३ पैकी १२ आगारातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. इगतपुरी आगार सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते. मात्र आगार बंद करण्यासाठी अन्य कर्मचाऱ्यांकडून सातत्याने दबाव येत आहे. नांदगाव आगारही या दबावामुळे बंद पडले. ऐन दिवाळीतील या संपाचा फटका प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या तृतीय तसेच चतुर्थ श्रेणी

कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संप पुकारला आहे. या संपाचा प्रारंभी जिल्ह्यात विशेष प्रभाव जाणवला नव्हता. परंतु, आता जिल्ह्यातील वेगवेगळय़ा आगारांची बससेवा कर्मचारी संपात सामील झाल्याने ठप्प झाली आहे.

ज्या आगारांचे कामकाज अद्याप सुरु आहे, त्यांच्यावर इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांकडून दबाव येत असल्याची परिस्थिती आहे. बाहेरील आगाराच्या बस वेगवेगळय़ा आगारात येत असल्याने त्यांच्यावरही बससेवा बंद ठेवण्यास सांगण्यात येत आहे. मालेगाव येथे बाहेरील स्थानकातून येणाऱ्या बस चालकाला केळी देवून त्या वाहनचालकाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

आगाराच्या आवारातच मागण्यांची घोषणा करत कर्मचाऱ्यांनी बस सुरू करणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.भाऊबीजेनंतर घरी परतणाऱ्या महिलांना, नोकरदारांना संपाची अधिक झळ बसला आहे. संप मिटला असेल, या आशेने स्थानकात येणाऱ्यांची निराशा होत असून बससेवा कधी सुरू होईल, याविषयी अनिश्चितता असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मालेगावपासून पुढे असलेल्या गावाहून नाशिकला येणे होते. मालेगावपर्यंत नातेवाईकांच्या गाडीने पोहोचले. परंतु, मालेगाव स्थानकात बससेवा ठप्प असल्याचे समजल्यानंतर नाशिकला येण्यासाठी खासगी वाहनातून प्रवास करावा लागला. बस भाडय़ापेक्षा जादा पैसे देत घर गाठल्याचे सोनाली बच्छाव यांनी सांगितले. घोटीजवळील मुंढेगाव येथील एका कंपनीत काम करणारे अमोल सरोदे म्हणाले,  कंपनीची बस चुकल्याने महामंडळाच्या बसने घोटी गाठायचे ठरवले. परंतु, कोणतीही बस न आल्याने घरी परतावे लागले.

दरम्यान, जिल्ह्यातील १२ आगार बंद असल्याने सोमवारी १७०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे एक कोटीहून अधिकचा  महसूल बुडाला. प्रवाश्यांना तसेच महामंडळाला संपाचा आर्थिक फटका बसला असून न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सिन्नर आगारातील बससेवा ठप्प आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सिटिलिंक बससेवा थेट सिन्नपर्यंत सुरू करण्यात आली आहे. या सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.