नाशिक : राज्यात आकारास आलेल्या नव्या सत्तासमीकरणात उत्तर महाराष्ट्रातून कुणा कुणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याबद्दल राजकीय पातळीवर तर्कवितर्क लढविले जात आहेत. ठाकरे सरकारमध्ये दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते. नव्या सरकारमध्येही त्यांची मंत्रिपदे कायम राहून खातेबदल होऊ शकतो. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांना वजनदार खाते मिळेल. शिवाय, भाजपच्या कोटय़ातून नाशिकमधून प्रा. देवयानी फरांदे किंवा सीमा हिरे, धुळय़ातून अमरीशभाई पटेल, माजी मंत्री जयकुमार रावल यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 राज्यातील सत्तेवरून पायउतार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्राच्या वाटय़ाला छगन भुजबळ, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या रूपाने चार मंत्रिपदे मिळाली होती. हे सर्व कॅबिनेट मंत्री होते. महत्त्वाची खाती संबंधितांना मिळाली होती. त्याआधीच्या म्हणजे भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये उत्तर महाराष्ट्रातील गिरीश महाजन, एकनाथ खडसे, दादा भुसे, जयकुमार रावल हे मंत्रिपदी विराजमान झाले होते. कालांतराने खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. ही एकंदर स्थिती पाहता नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्राचा हिस्सा वाढणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. मंत्रिपदासाठी भाजपकडून आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची समीकरणे लक्षात घेऊन नियोजन केले जाईल. गेल्या वेळी नाशिक महापालिकेवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. आगामी निवडणुकीत ती कायम राखण्यासाठी शहरातील भाजप आमदाराचा प्रामुख्याने विचार केला जाईल. नाशिक शहरात भाजपचे देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि अ‍ॅड. राहुल ढिकले हे तीन आमदार आहेत. ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर मंत्रिपदासाठी फरांदे किंवा हिरे यांच्यात चुरस राहील. नाशिकमधून मंत्रिपद दिल्याचा लाभ महापालिकेसह लोकसभा निवडणुकीत व्हावा, असा पक्षाचा प्रयत्न असेल. देवळा-चांदवड आणि बागलाण मतदारसंघात भाजपचे आमदार असले तरी ग्रामीण भागात प्रभाव वाढविण्यासाठी भाजपने दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मालेगाव बाह्यचे दादा भुसे हे विद्यमान मंत्री असल्याने त्यांचे मंत्रिपद कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.  नव्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असणाऱ्या गिरीश महाजन यांना वजनदार खाते निश्चित आहे. यापूर्वीच्या भाजप-सेना सरकारमध्ये महाजन यांच्याकडे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची जबाबदारी होती. नाशिकचे पालकमंत्रिपद भूषविताना त्यांनी महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली होती. मागील युती सरकारमध्ये पर्यटन खात्याची जबाबदारी धुळे जिल्ह्यातील जयकुमार रावल यांच्याकडे होती. या वेळी रावल यांना संधी मिळेल की अमरीश पटेल या ज्येष्ठ नेत्याचा विचार होईल, याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या नंदुरबारमध्ये भाजपने हळूहळू आपले बस्तान बसविले. एकनाथ शिंदे गटातील जळगावचे गुलाबराव पाटील हे महाविकास आघाडी सरकारमध्ये पाणीपुरवठामंत्री होते. त्यांना कोणते खाते मिळणार, याकडे जळगावकरांचे लक्ष आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cabinet minister for north maharashtra in shinde cabinet zws
First published on: 01-07-2022 at 00:51 IST