नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना पक्षचिन्ह असणाऱ्या चिठ्ठी वाटून प्रचार करणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले असताना दुसरीकडे सिडकोतील मोरवाडी येथील मतदान केंद्राबाहेर महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम, अबकी बार ४०० पार – मोदी सरकार, हेमंत अप्पा आगे बढो‘ अशा घोषणा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सोमवारी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सकाळी सुरुवात झाली. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी जाहीर प्रचार बंद झाला. पक्षचिन्ह, पक्ष वा उमेदवाराच्या प्रचारास प्रतिबंध आहे. असे असताना अनेक ठिकाणी पक्षचिन्ह असणाऱ्या चिठ्ठ्यांचे वाटप झाले. नांदुरगाव येथील मनपा शाळेच्या केंद्राच्या २०० मीटर परिसरात महायुतीचे हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांचे नाव व पक्षचिन्ह असणाऱ्या चिठ्ठ्या लोकांना वाटून प्रभाव टाकला जात असल्याचे उघड झाले. ओमकार बुनगे, समाधान धोंगडे, काशिराम निमसे अशी संशयितांची नावे आहेत. यावेळी एका संशयिताने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही कोण हे तुम्हाला माहिती आहे का, माझी वरपर्यंत ओळख आहे. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल’ असे म्हणत हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…नीट बोल…तुझी जहागीर आहे काय ? नाशिकमध्ये भाजप आमदार कोणावर भडकल्या ?

उमेदवाराचे नाव व पक्षचिन्ह प्रदर्शित करून प्रचाराचा प्रकार दिंडोरी रस्त्यावरील पुणे विद्यार्थी गृहाच्या शिक्षण संकुल परिसरात घडला. याबाबत हवालदार अशोक गावित यांनी तक्रार दिली. मतदान प्रक्रिया सुरू असताना संशयित जनेश स्वरानंद महाराज, शंकर पेदे, कैलास साळुंखी हे संशयित मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर शांतिगिरी महाराजांचा प्रचार करीत होते. उमेदवाराचे नाव व पक्षचिन्ह प्रदर्शित करताना आढळले. संशयितांमधील दोघांनी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते. त्यावर मोठ्या अक्षरात जय बाबाजी लिहिलेले होते. ही अक्षरे जाणीवपूर्वक मोठी आणि गोलाकार करून त्याला बादलीचा आकार दिला होता. जे शांतिगिरी महाराजांचे पक्षचिन्ह आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडकोतही शांतिगिरी महाराजांच्या अशाच चिठ्ठ्या वाटप केल्यावरून पोलिसांनी महाराजांचे भक्तगण भागवत निकम, संदीप पाटील, विष्णू करवट, पांडुरंग सदगिर या चौघांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. अनेक मतदान केंद्रांबाहेर पक्षचिन्ह व उमेदवाराचे नाव असलेल्या चिठ्ठ्यांचे वितरण सुरू होते. काही ठिकाणी मतदार त्या चिठ्ठ्या घेऊन थेट केंद्रातही जात होते.

हेही वाचा…नाशिक : मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयी

घोषणाबाजी करुन मतदान केंद्राबाहेर जाहीर प्रचार

मोरवाडी येथील स्वामी विवकानंद विद्यालयातील मतदान केंद्राला दुपारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी भेट दिली. त्यांचे आगमन होताच केंद्राबाहेर चिठ्ठी देण्यासाठी असणाऱ्या कक्षात समर्थकांनी जय श्रीराम, अबकी बार ४०० पार – मोदी सरकार, हेमंत अप्पा आगे बढो‘ अशा घोषणा दिल्या. गोडसे यांनी विजयाची खूण दाखवत कार्यकर्त्यांसमवेत छायाचित्र काढले. अंबड पोलीस ठाण्यालगतचे हे मतदान केंद्र आहे. गोडसे चार-पाच गाड्यांचा ताफा घेऊन आले होते. त्यामुळे मोरवाडी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. प्रतिबंध असताना घोषणाबाजीद्वारे मतदान केंद्राबाहेर खुलेआम जाहीर प्रचार केला गेल्याने मतदारांनाही धक्का बसला. या संदर्भात पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष आहे.