मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचाराची कोणतीही संधी उमेदवार वाया जाऊ देत नाही. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने हिंदूबहुल मालेगाव कॅम्प भागात सध्या प्रत्येक लग्नात राजकीय पदाधिकारी आणि उमेदवारांच्या समर्थकांची वर्दळ दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक लग्नांमध्ये आमंत्रण नसतानाही वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी उमेदवार उपस्थित राहत असल्याने वधूकडील मंडळींची अडचण होत आहे.

प्रचारासाठी असलेला कमी कालावधी लक्षात घेऊन प्रचाराचे वेगवेगळे प्रयोग अमलात आणले जात आहेत. सध्या सुरू असलेली लग्नसराई उमेदवारांना प्रचारासाठी चांगलीच कामास आली आहे. मालेगाव कॅम्प परिसरात लग्नातील प्रचाराची अनोखी धूम पाहावयास मिळत आहे. लग्नात एकाच ठिकाणी अनेकांची गाठभेट होत असल्याने प्रचाराचे हे तंत्र भलतेच प्रभावी ठरत आहे. वधू-वरांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मंगलाष्टके मध्येच थांबवून प्रचाराचे छोटेखानी भाषणच उमेदवारांकडून ठोकले जात आहे. लग्न मंडपात जाऊन प्रचार करण्याच्या या शैलीमुळे अनेक गमतीही घडत आहेत.

मालेगाव कॅम्पमध्ये सध्या होणाऱ्या प्रत्येक लग्नात संबंधित प्रभागातील उमेदवारांची गर्दी होताना दिसून येत आहे. काही वेळा प्रतिस्पर्धी अनेक उमेदवार एकाच वेळी एकाच मंगल कार्यालयात हजर होत असल्याने शुभेच्छारूपी भाषणांची लांबलचक मालिकाच सुरू झाल्याचे पाहावयास मिळते.

उमेदवाराची फजिती

मालेगाव कॅम्प ते दाभाडी या रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयात एक लग्न लागत असल्याची बातमी त्या परिसरातील एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराला मिळाली. प्रचारासाठी ही उत्तम संधी असल्याचे पाहून उमेदवार आणि त्याच्या बरोबर १० ते १५ समर्थकांनी निमंत्रण नसतानाही लागलीच मंगल कार्यालय गाठले.  मंगलाष्टके सुरू असतानाच त्यांनी भटजीला गाठत दोन मिनिटे बोलू देण्याची विनंती केली. वधू-वराकडील मंडळींनीही त्यांना बोलू दिले.  उमेदवाराने वधू-वरांना शुभेच्छा देत आपली ओळख सर्वाना करून दिली. प्रभागाच्या विकासासाठी आपणास विजयी करणे किती गरजेचे आहे हेही नमूद केले. त्याने हे सांगताच उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. उमेदवाराच्या समर्थकांनाही त्याची जाणीव झाली. उमेदवाराने शुभेच्छारूपी भाषण संपविल्यावर उपस्थितांपैकी एकाने त्यांच्याजवळ येत वास्तव काय आहे ते मांडले. उपस्थित वधू किंवा वर दोघांपैकी कोणीही त्या उमेदवाराच्या प्रभागाशी संबंधित नव्हते. दोनही बाजूंकडील मंडळी मालेगावला समान अंतर असणाऱ्या दोन गावांची होती. दोन्ही बाजूंकडील वऱ्हाडींना येण्या-जाण्यासाठी सोईचे म्हणून त्या मंगल कार्यालयाची निवड करण्यात आली होती. हे लक्षात आल्यावर प्रचाराचा बहुमोल वेळ वाया गेल्याचे उमेदवाराच्या लक्षात येऊन त्याने त्वरेने त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

मालेगाव कॅम्प भागात सेना-भाजपमध्ये चुरस

मालेगाव कॅम्प भागात शिवसेना आणि भाजप या दोघांमध्येच अधिक चुरस  दिसून येते. विद्यमान एकही नगरसेवक नसलेल्या भाजपने प्रचारात मारलेली मुसंडी सर्वाना चकित करणारी ठरली आहे. कॅम्प भागातील बहुतांश मतदारांची नाळ शेतीशी जुळलेली असल्याने आणि शेतीविषयक प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत असल्याने निवडणूक महापालिकेशी संबंधित असली तरी शिवसेनेकडून नेमका हाच मुद्दा प्रचारात मांडला जात आहे. राज्यात सत्तेत असूनही कायम एकमेकांवर टीका करणारे शिवसेना आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. नशिबाची साथ मिळत असल्याने प्रत्येक वेळी संकटातूनही शिवसेनेला यश मिळवून देणारे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागणार आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने मात दिल्याच्या पाश्र्वभूमीवर भुसे हे अधिक सावध झाले आहेत. अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपकडून त्यांना तगडे आव्हान मिळाले आहे. त्यामुळेच मालेगाव कॅम्प भागावरील शिवसेनेचे वर्चस्व टिकविण्यासाठी भुसे यांना चांगलेच कष्ट घ्यावे लागत आहेत.

पसंती नसतानाही अस्तित्व पणाला

राज्यात इतर ठिकाणी अल्पसंख्य असणाऱ्या मुस्लीम समाजाचे महापालिका क्षेत्रात प्राबल्य असल्याने शिवसेना आणि भाजप यांनी कितीही प्रयत्न केले तरी या ठिकाणी त्यांना सत्ता मिळणे कदापि शक्य नसल्याचे मानले जात आहे. भाजप तसेच शिवसेना यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका येथील मुस्लीमबहुल भागात त्यांना त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे या दोनही पक्षांनी मुस्लीमबहुल भागातही काही उमेदवार उभे केले असले तरी त्यांना विजयाची कोणतीही संधी नसल्याचे दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. भाजप, शिवसेनेविषयी जे मत मुस्लीमबहुल भागात आहे तसेच मत एमआयएमविषयी मालेगाव कॅम्पसारख्या हिंदुबहुल भागातील रहिवाशांमध्ये आहे. एमआयएम पक्षाच्या नेत्यांकडून इतरत्र केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे एमआयएमला मालेगाव कॅम्प भागात कोणतीच संधी नाही. त्यामुळेच ज्या ठिकाणी अजिबात संधी नाही त्या ठिकाणी प्रचारात वेळ वाया घालविण्यापेक्षा जिथे अपेक्षा आहे अशा ठिकाणी भाजप, शिवसेना आणि एमआयएम या पक्षांकडून प्रचारावर अधिक भर दिला जात आहे. सध्या तरी प्रचाराची धुरा सर्वच पक्षांचे स्थानिक नेतेच वाहत आहेत. निवडणूक महापालिकेची असली तरी प्रचारात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील मुद्देही मांडले जात आहेत.