समाजमाध्यमांवरील प्रचारावरही नजर

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवारांवरील गुन्ह्य़ांची माहिती राजकीय पक्षांसह स्वत: उमेदवारांना तीन वेळा जाहिरातीद्वारे द्यावी लागणार आहे. यासंबंधीचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निवडणूक काळात समाजमाध्यमांवर उमेदवाराचे प्रतिमाहनन होईल अथवा कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारे संदेश पसरविणाऱ्यांवरही सायबर गुन्हे शाखेची नजर राहणार असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गेल्या मतदानाच्या वेळी गुन्हेगारांवरील दाखल गुन्ह्य़ांची माहिती केंद्राबाहेर फलकांद्वारे सादर केली गेली होती. या वेळी दाखल गुन्ह्य़ांची माहिती उमेदवारांसह राजकीय पक्षांना एकूण तीन जाहिरातींद्वारे द्यावी लागणार असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले.

निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक काळात अशांतता पसरविणाऱ्या घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असून जिल्ह्य़ात ७५ जणांविरुद्ध तडीपारीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात ४४ लाख ४५ हजार ५५६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

त्यात २३ लाख ३२ हजार ५९० पुरुष तर २१ लाख १२ हजार ८८३ महिला असून ७६ तृतीयपंथी मतदार तर सात अनिवासी भारतीय मतदार आहेत. मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने त्यात आणखी वाढ होईल. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या नऊ लाखने वाढली आहे. सर्व मतदान केंद्रात यंदा व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. जिल्ह्य़ासाठी सहा हजार ४८९ व्हीव्ही यंत्रे प्राप्त झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राजकीय पक्ष, उमेदवारांशी संबंधित तसेच ज्यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमेदवाराचा प्रचार होईल, असे सर्व अनधिकृत फलक हटविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. याव्यतिरिक्त शासकीय कार्यालयांच्या आवारात सरकारी योजनांची माहिती देणारे फलक आहेत. तसेच एसटी बसगाडय़ांवर योजनांच्या माहितीसमवेत राजकीय नेत्यांचे छायाचित्र आहे, असे सर्व फलक, भित्तिपत्रके झाकून ठेवण्याचे काम सुरू आहे. खासगी जागेत तसे अनधिकृत फलक आढळल्यास उमेदवार, फलक उभारणारे आणि त्यास जागा देणाऱ्या जागामालकावर कारवाई होणार असल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले.

६० मतदान केंद्रे संवेदनशील

निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात चार हजार ४४६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. मतदार नोंदणीनुसार मतदानाच्या दिनांकापर्यंत त्यात वाढू होऊ शकते. प्रत्येक मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार राहतील. जिल्ह्य़ातील एकूण ६० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्यातील सर्वाधिक ४३ केंद्रे नाशिक लोकसभा अर्थात शहरातील आहेत. ग्रामीण भागातील म्हणजे दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील १७ केंद्रे संवेदनशील आहेत.

ई प्रचार खर्चात समाविष्ट

अर्ज दाखल करताना उमेदवाराला समाजमाध्यमांवरील आपल्या खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. समाजमाध्यमांवरील राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकीकरण केले जाईल. तसेच समाजमाध्यमांवरील प्रचाराच्या जाहिरातींचा खर्च निवडणूक खर्चात ग्राह्य़ धरला जाईल. प्रचारात समाजमाध्यमांचा वापर वाढला आहे. पण या माध्यमावर कोणाचे नियंत्रण नसल्याने प्रचारात खालची पातळी गाठली जाते. गेल्या वेळी मराठा-माळी वाद पेटविला गेला होता. समाजमाध्यमांवर उमेदवाराचे प्रतिमाहनन होईल, जातीत तेढ निर्माण करणारे, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणारे संदेश पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची नजर आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे राधाकृष्णन यांनी सांगितले.