जळगाव – जिल्ह्यातील दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात सध्या तीन संचांमधून एकूण १२१० मेगावॅट क्षमतेचे वीज उत्पादन सुरू आहे; याशिवाय लवकरच ६६० मेगावॅट क्षमतेचा चौथा संच कार्यान्वित होणार आहे. यामुळे दीपनगर प्रकल्पाची स्थापित वीज निर्मिती क्षमता १८७० मेगावॅटपर्यंत पोहोचणार असून, ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जेवर आधारीत प्रकल्पांमधून होणाऱ्या अतिरिक्त वीज निर्मितीची जोड मिळाल्यानंतर जळगाव जिल्हा ऊर्जा संपन्न होऊ शकणार आहे.
जळगाव जिल्ह्यात सध्या कार्यान्वित असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांमधून वीज निर्मिती वाढल्यामुळे विशेषतः औद्योगिक व कृषी क्षेत्राला त्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकणार आहे. उद्योग-व्यवसाय वाढीला चालना मिळाल्याने नव्या संधीही निर्माण होतील. दूरदृष्टीने केलेले नव्या ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन, वीज वितरण व्यवस्थेतील सुधारणा आणि बरोबरीला सौर ऊर्जेवरील अपांरपरिक स्त्रोतांच्या बळकटीकरणामुळे जळगावची ऊर्जा संपन्नतेच्या बाबतीत वेगळी ओळख तयार होणार आहे. जळगावच्या प्रगतीचा मुख्य कणा असलेल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात सध्या प्रत्येकी ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन आणि २१० मेगावॅट क्षमतेचा एका संच कार्यरत आहे. त्याठिकाणी लवकरच ६६० मेगावॅट क्षमतेचे चौथे युनिट कार्यान्वित होणार असून, सर्व परवानगी आणि चाचण्या पूर्ण होताच त्यामाध्यमातून प्रत्यक्ष वीज उत्पादन सुरू होईल.
सौर ऊर्जेवरील प्रकल्पांसाठी ३९०० हेक्टर जागा
जळगाव जिल्ह्यात सौर ऊर्जेवर आधारीत विविध ठिकाणच्या लहान-मोठ्या वीज निर्मिती प्रकल्पांसाठी सुमारे ३९०० हेक्टर जागा जिल्हा प्रशासनाच्या मदतीने उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्याद्वारे ९०० मेगावॅट वीज तयार होऊ शकणार आहे. दरम्यान, ३२८ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जेवर आधारीत प्रकल्प सध्या बांधकामाधीन आहेत तर २० मेगावॅट क्षमतेचा एक प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. याशिवाय सौर कृषीपंप तसेच छतावरील सौर पॅनेलद्वारे तयार होणारी ऊर्जा अतिरिक्त ठरणार आहे.
जळगावला ऊर्जासंपन्न जिल्हा म्हणून मिळणारी ओळख भविष्यात औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पोषक ठरणार आहे. नागरिकांनीही शाश्वत आणि सक्षम ऊर्जा व्यवस्थेत योगदान देण्याकरीता वीज चोरी रोखण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)