धुळे – रस्त्यावरील वाहनांना अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील पोलिसांनी एकास अटक केली असून, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयिताकडून पाच हजारांची रोख रक्कम, एक भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केला.
तालुक्यातील हेंकळवाडी येथील समाधान पाटील हे मालवाहतूक वाहनाने नवलनगर ते नंदाळे असा प्रवास करतांना त्यांना आंबोडे गावाजवळील डोंगराजवळच कारमधून आलेल्या चौघांनी अडविले. पाटील यांच्याकडे असलेली ४० हजार रुपयांची सोनसाखळी, १० हजार रुपये रोख असा ऐवज बळजबरीने घेऊन पोबारा केला. १८ मार्च रोजी भरदुपारी घडलेल्या या घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा – नाशिक : दहावीतील विद्यार्थ्यावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला
हेही वाचा – नाशिक : सर्व्हर डाऊनमुळे एमबीए पूर्व परीक्षेत गोंधळ; शेकडो विद्यार्थ्यांना फटका
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रमजान महेबूब पठाण (२३, रा.वडजाई रोड, धुळे) यास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली. विजय गायकवाड (रा. समता नगर, धुळे), वसीम हुसेन शेख उर्फ वसीम बाटला (रा.जनता सोसायटी, धुळे), सत्तार मसून पिंजारी उर्फ सत्तार मेंटल (रा.पत्रावाली मशीदजवळ, धुळे) अशी या संशयितांची नावे आहेत. या सर्वांना मनोज पारेराव (रा.संगमा चौक धुळे) याने गुन्ह्यात वापरलेली कार दिली होती. अशी माहितीही पोलिसांना संशयितांनी दिली.