नाशिक – कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची सिडकोतील जाहीर सभा संपल्यानंतर त्यांना अटकाव करीत भाजपचे उमेदवार आमच्या मुलाची बनावट चित्रफित दाखवून खोटा प्रचार करतात का, असा प्रश्न विचारत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अखेरच्या टप्प्यात एमडी ड्रग्जचा विषय आला. सिडकोतील पवननगर मैदानात कुंभमेळामंत्री महाजन यांची सोमवारी रात्री  सभा झाली होती. यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांशी शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तथा बंटी तिदमे यांचा संबंध असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली. प्रभाग २४ मध्ये युवापिढी खुलेआम एमडी ड्रग्जचे सेवन करते. अमली पदार्थ विक्रेत्यांचे तिदमे यांच्याशी संबंध आहेत.

तिदमे हे बांधकाम व्यावसायिकांना धमकावतात. असे आरोप करीत महाजन यांनी चित्रफित, छायाचित्र सादर करीत शिंदे गटाला धक्का दिला होता. सभा आटोपून महाजन निघाले होते. तेव्हा शिवाजी चौक भागात संशयित सुनील पाटील (५२), निशांत पाटील (२१)) आणि शिल्पा मोराडे यांनी त्यांना अटकाव करीत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. भाजपचे उमेदवार आमच्या मुलाची खोटी चित्रफीत दाखवून खोटा प्रचार करतात का, असे विचारत संशयितांनी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड केली. मंत्री निघून गेल्यानंतर संशयितांनी शिवीगाळ केल्या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस शिपाई केशव ढगे यांनी तक्रार दिली.

महापालिका निवडणुकीत एमडी ड्रग्जवरून सत्ताधारी भाजपने मित्रपक्ष शिंदे गटाला घेरल्याचे समोर आले. बनावट, खोडसाळ चित्रफित तयार करून आपणास बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी म्हटले आहे. प्रचार अतिशय खालच्या पातळीवर नेण्याचा प्रकार आपले विरोधक चुंभळे परिवाराकडून नेहमी केला जातो. बनावट, खोडसाळ चित्रफित प्रसारित करून बदनाम करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्यांनी कैलास चुंबळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.

दरम्यान, याआधी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एमडी ड्रग्ज, अंमली पदार्थांची विक्री हे विषय आले होते. तेव्हा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केेले होते. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट हे दोघे स्वतंत्रपणे मैदानात आहेत. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने या मुद्यावरून शिंदे गटाला लक्ष्य केले.