जळगाव – रोजगारासाठी नाशिकला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे परस्पर कोल्हापूरला लग्न लावणाऱ्या व्यक्तींकडून होणाऱ्या त्रासामुळे शहरातील एका प्रौढाने रविवारी गळफास घेतला. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकूण पाच जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच अल्पवयीन मुलीच्या लग्न प्रकरणात तिच्या आईचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळले आहे.
जळगावमधील हरिविठ्ठल नगरात आई-वडील आणि दोन लहान भावंडाबरोबर राहणारी मुलगी रोजगारासाठी तिच्या एका मैत्रिणीबरोबर जानेवारीमध्ये नाशिक येथे गेली होती. मात्र, मे महिन्यात तिने कोल्हापुरातील एका तरूणाशी लग्न लागल्याची माहिती तिच्या भावाला मिळाली. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही झाला. दरम्यान, ती जळगाव येथे काही दिवसांपूर्वी आई-वडिलांकडे आली. आणि दोनच दिवसात पुन्हा निघून गेली. या प्रकारानंतर मुलीचे लग्न लावून देणाऱ्या दोन मध्यस्थी महिला व एका पुरूषाने लग्नावेळी दिलेले चार तोळे सोने व दोन लाख रूपये परत करण्यासाठी तिच्या आई-वडिलांकडे तगादा लावला. मध्यस्थी महिला व पुरुषांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी मुलीच्या वडिलांनी घरात गळफास घेतला. या प्रकरणी मुलीच्या काकांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यस्थी महिला मनीषा जैन, सुजाता ठाकूर आणि सचिन अडकमोल यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु, तपासात थेरगाव (जि. कोल्हापूर) येथील आशिष गंगाधरे व आप्पासाहेब गंगाधरे यांचीही नावे समोर आली. त्यानुसार, दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मुलीच्या पित्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आता कोल्हापूरच्या एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. या प्रकरणात मुलीच्या लग्नाचा बनाव करून दोन लाख रुपये रोख आणि चार तोळे सोने घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणूक प्रकरणात मुलीच्या आईचाही सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आपल्या मुलीचे लग्न झाल्याचे तिला आधीच माहिती होते, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.