शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. अंबड पोलीसांनी घरफोडी आणि फसवणूक या गुन्हातील चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून ४५ तोळे सोने व रोख रक्कम असा २८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अन्य काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. अशोक ठाकरे यांच्या मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत संशयित आकाश शिलावट (रा. नाशिकरोड) याने तिच्या घरातील साडेबारा तोळे सोन्याचे दागिने चोरले.

याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंबड पोलिसांनी संशयित आकाश यास सापळा रचत अटक केली. त्याच्याकडील साडेबारा तोळे सोने हस्तगत केले. दुसऱ्या घटनेत आनंद रायकलाल (रा. अंबड) यांच्या घरात चोरट्याने घरफोडी करत ३२ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. पोलिसांनी संशयित अक्षय जाधव (२६.अंबड) तसेच संदीप अल्हाट (२४), बाबासाहेब पाईकराव (२८), विकास कंकाळ (२१) तिघे राहणार कांबळेवाडी यांना अटक केली असल्याची माहिती पाेलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली. संशयितांनी सोने विकून सहा लाख ५० रुपये घेतले. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे.