नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश देण्याच्या मोबदल्यात २८ लाख ८० हजार रुपयांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या नाशिक आणि पुणे येथील घरांतून तब्बल एक कोटी ४४ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. न्यायालयाने त्याला रविवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हरसूल येथील मुला-मुलींच्या वसतिगृहात मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश देण्यासाठी बागूल याने अडीच कोटींच्या कामांच्या १२ टक्के यानुसार २८ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी बागूलच्या नाशिक, पुणे आणि धुळे येथील घरांवर छापे टाकले होते.

पुणे आणि नाशिक येथील घरांत एकूण एक कोटी ४४ लाख रुपयांची रक्कम मिळाली. ही रक्कम कुठून आली याची चौकशी सुरू आहे. बागूल याला  येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

अपसंपदेचाही गुन्हा..

कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागूल याच्या इतर मालमत्तांचा शोध घेण्यासाठी खुल्या चौकशीला शासनाकडून परवानगी मिळाली आहे. सोमवारपासून चौकशी सुरू होईल. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बागूल याच्या कुठे कुठे मालमत्ता आहेत याची माहिती मागितली जाणार आहे. याप्रकरणी बागूल विरुद्ध अपसंपदेचा दुसरा गुन्हा दाखल होणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.