नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या ग्रामीण भागात टंचाई अधिक गहिरी होऊ लागली असून हरसूल आणि ठाणापाडा परिसरातील अनेक विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईची दाहकता तीव्र झाली आहे. माणसांप्रमाणेच गुराढोरांनाही पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करणे भाग पडत आहे. महिलांना पाण्याच्या शोधार्थ रात्रीचा दिवस करावा लागत आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तोरंगण या प्रमुख गावासह अनेक वाडय़ा-वस्त्यांवरील विहिरी, कूपनलिका, तलाव, वनबंधारे कोरडेठाक पडले. गावाच्या जवळचे पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी कोसो दूर महिलांना जावे लागते. पुरुष वर्ग बैलगाडी, सायकल, मोटरसायकल, चारचाकी वाहनांतून पाण्याची वाहतूक करून तहान भागविण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाचे माहेरघर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी पावसाळय़ात २००० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊनही तालुक्याच्या ग्रामीण भागाला एप्रिल-मे महिन्यातच टंचाईला सामोरे जावे लागते. तालुक्यात जलयुक्त शिवार योजना, वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम, पाणी आडवा-पाणी जिरवा, कृषी विभागाचे पाणी अडविण्यासाठी मजगीकरण, वनतळे, बंधारे याबरोबरच शासनाच्या विविध विभागांमार्फत पाण्याच्या उपलब्धतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. लाखोंच्या रुपयांच्या योजना राबवूनही तोरंगण गाव तहानेने व्याकूळ झाले आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या असल्या तरी नियोजनाअभावी सर्वसामान्य जनतेसोबतच मुक्या प्राण्यांनाही पाण्यासाठी त्रास सोसावा लागत आहे. सर्वत्र भीषण टंचाई निर्माण झाल्याने घोटभर पाण्यासाठी वन्यप्राणी-पक्षी गावात, वाडय़ावस्त्यांवर फिरकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील जंगलांमध्ये वनविभाग आणि अन्य यंत्रणेकडून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी होत आहे. त्यांना पाण्याची पर्यायी व्यवस्था करून देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. याविषयी तोरंगणचे राहुल बोरसे यांनी माहिती दिली. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत तोरंगण गावाचा समावेश करण्यात आला असून या योजनेत इतर आठ गावे आहेत, त्यामुळे तोरंगणला पाणी मिळेल की, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाला तळ गाठावा लागेल, हा प्रश्न आहे, तोरंगण, वाहंदरी या गावांना स्वतंत्र जलजीवन मिशन योजना द्यावी आणि पाणीटंचाई थांबवावी, अशी मागणी बोरसे यांनी केली.
‘जलयुक्त शिवार’ असूनही टंचाई
निरगुडे येथून आठ ते १० किलोमीटरची पाइप-लाइन करून पाणी गावात आणले, परंतु अल्पावधीतच योजनेची नासधूस झाली. दोन विहिरी खोदून पाइपलाइनद्वारे पाण्याची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु विहिरींना अपूर्ण पाणी असल्याने तो बारगळला. सोशल नेटवर्किंग फोरमचा जल-शुद्धीकरण प्रकल्प मात्र गावकऱ्यांच्या वापराविना धूळ खात पडला आहे. सामाजिक संस्थेकडून तोरंगणला दोन टाक्यांची निर्मिती (१० हजार लिटर ) मात्र पाण्याविना कोरडय़ा-ठाक आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून गावात मुक्कामी राहून पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन कागदावरच राहिले असून ग्रामपंचायतीने केलेल्या तीन कूपनलिकाही कोरडय़ा झाल्या आहेत. तीन कूपनलिकांपैकी दोन बंद अवस्थेत आहेत. जलयुक्त शिवार योजनेवर मोठा खर्च झाला असला तरी टंचाई कायम आहे.