नाशिक: नाशिकजवळील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड पुन्हा एकदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, ५२ हजारांवरुन अजय कुमार यांच्या संपत्तीने ५.५९ कोटींवर उडी मारल्याने त्यांची ही संपत्ती संशयाच्या घेऱ्यात सापडली. या गुन्ह्यात अधिकाऱ्यासह या बेकायदेशीर उत्पन्नात त्यांना प्रत्यक्ष साथ देणाऱ्या आणि गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्या त्यांच्या पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनाही सीबीआयने सहसंशयित केले आहे.
२०१२ च्या बॅचचे आयडीईएस अधिकारी असलेले संशयित देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांची मालमत्ता इतकी झपाट्याने ५.५९ कोटींवर पोहचली की कोणालाही आश्चर्य वाटावे. सीबीआयने १ जानेवारी २०१४ ते १३ जून २०२४ या कालावधीतील अजय कुमार यांच्या कायदेशीर मालमत्तेचा तपास केला. प्रारंभी त्यांची मालमत्ता केवळ ५२ हजार रुपये होती. तपास पूर्ण होईपर्यंत मालमत्तेचा आकडा ५ कोटी ५९ लाख ६७ हजार रुपयांपर्यत पोहचला.
दुसरीकडे, याच काळात त्यांनी ५ कोटी १७ लाख रुपये खर्च केले. याचाच अर्थ त्यांची बचत फक्त १३ लाख ६४ हजार रुपये झाली. असे असतानाही, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. याबाबत कोणताही कायदेशीर स्त्रोत त्यांच्याकडून सीबीआयला देण्यात आला नाही.
काळा पैसा आणि संपत्ती लपवण्यासाठी अथवा हस्तांतरित करण्यासाठी अजय कुमार यांना पत्नी स्मिता कुमारी आणि आई निर्मला देवी यांनी मदत केल्यामुळे त्यांच्याविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाख ६७ हजार रुपयांवर पोहोचली.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा इतका मोठा अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात अडकल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. सीबीआय तपासात बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या मालमत्तेचा तपशील पुढे आला आहे. त्यानुसार, सीबीआयने तपास सुरु करण्यापूर्वीची एकूण संपत्ती – रुपये ५२,४२८.५६, तपास कालावधी पूर्ण झाल्यानंतरची संपत्ती – रुपये ५,५९,६७,८१५, तपास कालावधीतील अधिकृत उत्पन्न – रुपये ५,०४,२८,९२४, तपास कालावधीतील एकूण खर्च –रुपये ५,१७,९३,०४४, अपेक्षित बचत –रुपये १३,६४,१२०, एकूण बेहिशेबी मालमत्ता – रुपये ५,७२,७९,५०६.४४ असे एकंदर विवरण आहे.
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. त्यात नवीन प्रकरणाची भर पडली आहे. सीबीआयने केलेल्या या तपासात अजून काय काय निष्पन्न होईल, याकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
